
सावंतवाडी : धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात जालन्यात सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि मागणी तातडीने पूर्ण करण्याच्या विनंतीसाठी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई आणि सकल धनगर समाज सावंतवाडी यांच्या वतीने आज सावंतवाडी तालुक्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले.
धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोऱ्हाडे यांनी जालना येथे धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडीतील धनगर समाज एकवटला आहे. सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबईच्या सावंतवाडी शाखेच्या कार्यकारिणी पदाधिकारी आणि समाज बांधवांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनात, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावून दीपक भाऊ बोऱ्हाडे यांचे उपोषण सोडवावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
यावेळी मंडळाचे सावंतवाडी कार्यकारिणीचे पदाधिकारी, अध्यक्ष लक्ष्मण नवलू पाटील, सचिव विलास जंगले, उपाध्यक्ष आनंद वरक, खजिनदार लक्ष्मण धोंडू पाटील यांच्यासह सदस्य शेखर डोईफोडे, धाकू बुटे, रामा कोकरे, जनार्दन लांबर, लक्ष्मण गावडे, संजू गावडे, संतोष पाटील, संदीप पाटील, राजू पाटील, जनार्दन लांबर इत्यादी कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर समाजाने आपल्या न्याय हक्कांसाठी एकजूट दाखवत, आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून शासनाने यावर त्वरित निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.










