
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी नुकतेच कुडाळ तालुक्यातील नेरुळ वाघचौडी येथील 52 चुलीच्या गणपतीचे दर्शन घेतले. एकाच छताखाली एकत्र राहणाऱ्या 52 कुटुंबांनी एकत्रितपणे बसवलेला बाप्पा पाहून पोलीस अधीक्षक भारावून गेले. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी या कुटुंबांना भेट दिली आणि त्यांच्यासोबत संवाद साधला.
या भेटीदरम्यान, पोलीस अधीक्षक दहीकर यांनी कुटुंबातील ज्येष्ठांशी आस्थेवाईकपणे संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एवढ्या मोठ्या कुटुंबाचे एकत्रित येणे आणि सण साजरा करणे हे कौतुकास्पद आहे, असे उद्गार त्यांनी काढले. ही भेट केवळ गणपती दर्शनापुरती मर्यादित नसून, समाजात एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली.
पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या अनपेक्षित भेटीमुळे कुटुंबातील सदस्य आनंदित झाले आणि त्यांनी पोलीस प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.