शालेय शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात शिक्षकेतर संघटनेचं रविवारी अधिवेशन !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 06, 2024 19:15 PM
views 94  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे ५१ वे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार ७ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर होत आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघात हे अधिवेशन होत असल्याने आमच्या महामंडळाच्या मागण्या त्यांच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी व्यक्त केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


 यावेळी महामंडळाचे विभागीय सचिव गजानन नानचे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अनिल राणे, जिल्हा उपाध्यक्ष सुहास देसाई, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वैभव केंकरे, गणेश देसाई, यादवराव ठाकरे, श्री. पारकर आदी उपस्थित होते. महामंडळाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने यापूर्वीही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी वेळोवेळी चर्चा झाली असून त्यांनी आमच्या मागण्या रास्त असल्याचे मान्य केले आहे. यातील प्रमुख मागणी म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बक्षी समितीने खंड १ मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केलेला १०/ २० / ३० च्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करण्यात यावी तसेच न्यायालय निर्णयानुसार राज्यातील सर्व माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ वर्षानंतर दुसरा लाभ मंजूर करून फरक देण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणी असून ती या अधिवेशनात नक्कीच पूर्ण होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

       

त्याचप्रमाणे शिक्षकेतर आकृतीबंधबाबत नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेला अहवाल जसाच्या तसा मंजूर करून चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीसह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती त्वरित परवानगी मिळावी. तसेच राज्यातील शिक्षकेतरांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना  तात्काळ विनाअट मान्यता देण्यात यावी, महाराष्ट्र विधान परिषदेतील शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा अधिकार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळावा,माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकेतरांच्या वेतन व वेतनश्रेणीस संरक्षण मिळावे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय परीक्षा मंडळावर शिक्षकेतरांना विभाग वार प्रतिनिधित्व मिळावे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करावी अशा एकूण १९ मागण्यांचे प्रमुख ठराव या अधिवेशनात घेण्यात येणार आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

      

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना ही राज्यातील एकमेव संघटना आहे की ज्यात इतर घटक संघटना नाहीत. हे ३६ जिल्ह्यांचे महामंडळ आहे. त्यामुळे या अधिवेशनात आमची एकजूट नक्कीच दिसून येईल. या महामंडळाच्या स्थापनेनंतर ५६ वर्षातील हे ५१ वे अधिवेशन असून कोकण विभागात होत असलेल्या या अधिवेशनात राज्यभरातून किमान ६ ते ७ हजार शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहतील असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.