
सावर्डे : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धा-२०२५ मध्ये कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे चा विद्यार्थी सुजल निवाते व माजी विद्यार्थी प्रणय फराटे यांची कलाकृती राज्यात सर्वोत्कृष्ट ठरली आहे.
विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे प्रथमच विद्यापीठात प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला राज्यभरातील चित्रकारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. पश्चिम महाराष्ट्रासह बेळगाव, मुंबई, पुणे, रत्नागिरी इत्यादी ठिकाणांहून १२० चित्रकार यात सहभागी झाले. सकाळी नोंदणी आणि उद्घाटन समारंभानंतर सर्व कलाकारांनी विद्यापीठाच्या परिसरात फेरफटका मारला आणि आपल्याला भावलेल्या दृष्याची निवड करून तेथे चित्र काढण्यासाठी बसले. कोवळ्या उन्हाचे दुपारी तळपत्या उन्हात रुपांतर झाले तरी त्याचे भान या चित्रकारांना राहिले नव्हते, इतके ते चित्र काढण्यामध्ये गुंगून गेल्याचे दिसले.
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सुद्धा या कलाकारांची चित्रे पाहण्यासाठी त्यांच्याभोवती गर्दी केली. त्याकडेही त्यांचे लक्ष नव्हते. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या परिसरात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनीही मोटारीतून उतरून हे चित्रकार काढत असलेली चित्रे मोठ्या कुतूहलाने पाहिली आणि त्यांचे कौतुक केले.
सायंकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. ही स्पर्धा विद्यार्थी विभाग आणि खुला कलाकार विभाग अशा दोन विभागांत घेण्यात आली. दोन्ही विभागांमध्ये सर्वोत्कृष्ट पाच चित्रकारांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोप आणि रोख ५००० रुपये असे पारितोषिकाचे स्वरुप होते.
विद्यार्थी विभागात सुजल निवाते तर खुल्या कलाकार विभागात प्रणय फराटे यांचे चित्रे सर्वोत्कृष्ट ठरले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ चित्रकार सुनील पुजारी (मुंबई), शरद तावडे (मुंबई) आणि महेश होनुले (बेळगाव) यांनी काम पाहिले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी पहिल्याच वर्षी स्पर्धेला लाभलेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशी सूचना केली. पारितोषिक वितरण समारंभास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, माजी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी कॅनव्हासवर निसर्गचित्र रंगवून स्पर्धेचे अभिनव पद्धतीने उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले, तर डॉ. राजश्री खटावकर यांनी आभार मानले. प्रख्यात चित्रकार बबन माने, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर, नागेश हंकारे यांनी स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले.
या यशस्वी विद्यार्थ्याचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, पूजा निकम,अनिरुद्ध निकम कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव तसेच प्राध्यापक यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.