
दोडामार्ग : कोणी नसताना सुहास देसाई व आमची जी मैत्री आहे. आजही ती मैत्री तशीच आहे व ती आम्ही दोघांनीही जपली. सुहासच व्यक्तिमत्त्व सर्वगुण संपन्न असून ते वाखाणण्याजोग्या आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. यावरून सुहासचा लोकसंपर्क लक्षत येतो. सुहासने २५ वर्ष पत्रकारीताच नाही तर सामाजिक व राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून तळागाळातील लोकांच्या व समाजातील सर्व घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला त्याने यापुढेही कार्यरत राहावे. अशा शुभेच्छा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिल्या.
पत्रकार सुहास देसाई यांच्या रौप्य महोत्सवी पत्रकारिता पार्श्वभूमीवर त्यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग तालुका पत्रकार समिती व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना दोडामार्ग, शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग व मित्र परिवार पाल पुनवर्सन यांच्या माध्यमातून अभिष्टचिंतन सोहळा आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी शुभेच्छा देताना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सुहास देसाई यांच्या मैत्रीचे काही किस्से उलगडत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, जेष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, गोवा नेहरू युवा केंद्राचे उप संचालक के. के. घाटवळ, प्रतिथयश उद्योजक विवेकानंद नाईक, दैनिक कोकणसादचे संपादक व दोडामार्ग तालुका पत्रकार समिती अध्यक्ष संदीप देसाई, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष गजानन नानचे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, सल्लागार काका मांजरेकर, तालुका अध्यक्ष शाबी तुळसकर, बाबूराव धुरी, प्रेमानंद देसाई, राजेंद्र निंबाळकर, गोपाळ गवस, प्रा. संदीप गवस, संजय गवस, अनिल मोरजकर, ज्येष्ठ ग्रामस्थ मधुकर सावंत, पाल पुनर्वसन सरपंच श्रद्धा नाईक, झरे १ च्या सरपंच श्रुती देसाई, सत्कार मूर्ती सुहास देसाई, माजी सरपंच संगिता देसाई, कुंब्रल माजी सरपंच प्रवीण परब, एडवोकेट सोनू गवस, उदय पास्ते, कोनाल उपसरपंच रत्न कर्पे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या सानवी दळवी, संजना सावंत, सदस्य गणपत देसाई दोडामार्ग तालुक्यातील पत्रकार व हितचिंतक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सुहास देसाई यांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक चळवळीतील हरहुन्नरी कार्यकर्ता असं कौतुक करत उद्योजक विवेकानंद नाईक यांनी सुहास ची वाटचाल विशद केली. अगदी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सुहास चे सुरू झालेलं काम ते पत्रकारिता, सहकार, पर्यटन आणि आता शिक्षण क्षेत्र याचा आडावा घेत गोरगरिबांना न्याय देण्यासाठी त्याची असलेली एकंदरीतच धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे, अशा शब्दात सुहास देसाई यांच त्यांनी कौतुक केले. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा पत्रकार अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर यांनी सुहासला शुभेच्छा दिल्या. नाही हा शब्द डिक्शनरीत नसलेला पत्रकार अशा शब्दात उमेश तोरसकर यांनी सुहासला शुभेच्छा दिल्या. तसेच दोडामार्ग पत्रकार समितीने पत्रकारितेत २५ वर्षे पूर्ण केकेल्या पत्रकाराचा असा आगळा वेगळा सन्मान कार्यक्रम आयोजन करत एक वेगळा पायंडा घातल्याचे सांगत अध्यक्ष संदीप देसाई व पत्रकार समितीचंही कौतुक केल. यावेळी संदीप देसाई यांनी सुहास देसाई यांनी दोडामार्ग तालुक्यात पत्रकारितेत दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं सांगितलं. अगदी तिलारी प्रकल्प, तीलारीतील गांजा प्रकरण ते हत्ती मानव संघर्ष आणि आज अशा अनेक महत्वाच्या विषयांवर देसाई यांची पत्रकारिता खऱ्या अर्थाने चालली. आज शालेय शिक्षण विभागात आपल कर्तव्य बजावत असताना पत्रकारिता आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ते समाजसाठी सातत्याने लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेतून समाजातील विविध प्रश्नांना न्याय देतात. पत्रकार समिती सर्वच पत्रकारांचा कौटुंबिक वाढदिवस साजरा करते, यावर्षी देसाई यांना पत्रकारितेत पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याने एक वेगळा पायंडा घालण्याचा मनोदय पत्रकार समितीने मांडला आणि आज तो पूर्णत्वास जात असल्याचं समाधान असल्याचे मनोगत प्रास्ताविकमधून मांडले. सूत्रसंचालन सचिव गणपत डांगी यांनी केले. आभार संदेश देसाई यांनी मानले. यावेळी बाबुराव धुरी, प्रेमानंद देसाई, राजू निंबाळकर, गजानन नानचे, प्रा. संदीप गवस, सौ. संगिता देसाई, पत्रकार तेजस देसाई यांनीही सुहास देसाई यांना वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
सुहास ही एक चालती बोलती संस्था : के.के. घाटवळ
सुहास देसाई हा हाडाचा कार्यकर्ता आहे. पत्रकार, शिक्षकेतर कर्मचारी याही पेक्षा तो एक सच्चा व प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता आहे. नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून काम करत असताना त्याने अनेक मित्र जोडले. कोणतेही अशक्य काम तो अगदी सहज करीत असे. त्याच्या माणसे जोडण्याच्या कलेतूनच त्याला हे सहज अवगत होत असे. आजही तो त्याच उमेदीने कार्यरत आहे. समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी तो करीत असलेले कार्य निश्चितच स्तुत्य असून सुहास ही एक चालती बोलती संस्था आहे, अशा शब्दांत नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक के. के. घाटवळ यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार समितीचे सचिव गणपत गणपत डांगी, खजिनदार रत्नदीप गवस, सहकारी ऋषिकेश धरणे, संदेश देसाई, लखु खरवत, महेश लोंढे, भिकाजी गवस, ओम देसाई, समीर ठाकूर, गजानन बोंद्रे आदी उपस्थित होते.
दोडामार्ग पत्रकार समितीच्यावतीनं खास सन्मान
पत्रकारितेत 25 वर्षे योगदान देणाऱ्या सुहास देसाई यांना या अभिष्टचिंतन सोहळ्यात विशेष सन्मानचिन्ह, छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेटवस्तू देत शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन समितीचे अध्यक्ष संदीप देसाई, सचिव गणपत डांगी यांसह सर्वच उपस्थित पत्रकारांनी सुहास देसाई यांना सन्मानित करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.