डेगवे येथे टाकीत पडलेल्या गव्याची सुटका..!

वनविभागाने केले यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन
Edited by: विनायक गांवस
Published on: April 20, 2023 12:31 PM
views 526  views

सावंतवाडी : मौजे डेगवे येथील मोयझरवाडी मध्ये राहणाऱ्या दिनेश सडवेलकर यांचे घरच्या मागे बागायतीला लागून शौचालय आहे. या शौचालयासाठी शोषखड्डा म्हणून जमिनीत बांधण्यात आलेल्या आयताकृती, सिमेंटच्या टाकीमध्ये आज पहाटेच्या वेळी एक अपघाताने पडला. सकाळी 9 च्या सुमारास सडवेलकर यांना याची कल्पना आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला.

     सदर घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी वन विभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाचे निरीक्षण केले असता, एक पूर्ण वाढ झालेला अंदाजे 7 वर्षांचा नर गवा टाकीमधून बाहेर यण्यासाठी धरपड करत असल्याचे दिसून आले. गव्याला कोणत्याही प्रकारची मोठी जखम वा इजा नसून गवा सुखरूप असल्याचे निदर्शनास आले. परंतु सदरची टाकी ही 10x15 फूट मापाची, अंदाजे 15 फूट खोलीची असल्या कारणाने गवा सहजासहजी वर येऊ शकत नव्हता. शेवटी गव्याची सुटका करण्यासाठी त्या टाकीची एक बाजू JCB च्या सहाय्याने खोदून गव्याला मार्ग मोकळा करून देण्याचा पर्याय वन विभागाच्या रेस्क्यू टीमने शोधून काढला. त्यानुसार JCB च्या सहाय्याने खुदाई करून टाकीची एक बाजू मोकळी करण्यात आली व गव्याची नैसर्गिक अधिवासात सुखरूप सुटका करण्यात आली.

  वन विभागाचे सदरचे रेस्क्यू ऑपरेशन हे मा.उपवनसंरक्षक सावंतवाडी एस. नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, बांदा वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक संतोष देसाई, वनरक्षक संतोष मोरे, वनमजुर आत्माराम सावंत, रामदास जंगले या वन विभागाच्या रेस्क्यू टीम सोबतच डेगवे सरपंच राजन देसाई, सदस्य राजेश देसाई, मधुकर देसाई व उपस्थित डेगवे ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या मोलाच्या सहकार्याबद्दल वन विभागाने डेगवे ग्रामस्थांचे आभार मानले.!