
चिपळूण : पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटन, फळबाग, भाजीपाला उत्पादन यांसारख्या पूरक व्यवसायांची कल्पक जोड देत चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील शेतकरी अनंत बाबाजी खांबे यांनी शेतीला खऱ्या अर्थाने उद्योगाचा दर्जा मिळवून दिला आहे. त्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांसाठी नवे मार्गदर्शन निर्माण झाले आहे.
खांबे हे सध्या गावाचे सरपंच असून वडिलोपार्जित शेतीला कुटुंबातील २० सदस्यांच्या मनुष्यबळाच्या सहाय्याने उत्पादकतेकडे वळवले आहे. भातशेतीसह फळबाग, नाचणी, भाजीपाला यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांनी घेतला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत ३०० काजू रोपांची लागवड, ठिबक सिंचन, पॉवर व्हिडर आणि २० गुंठ्यांतील पॉलीहाऊसमध्ये जरबेरा उत्पादनासाठी ७.५ लाखांचे अनुदान मिळवणे, हे त्यांचे यशाचे ठळक पैलू आहेत.
खांबे यांनी रत्नागिरी आठ, वांगी, कलिंगड, चवळी, लाल माठ आदींचे उत्पादन घेऊन सावर्डा, खेर्डी, माखजन आदी बाजारपेठांमध्ये स्वतः विक्रीचे नियोजन केले आहे. "फक्त पीक घेऊन थांबू नका, तर मार्केटची मागणी ओळखा, विक्रीचे तंत्र आत्मसात करा," असा सल्लाही ते इतर शेतकऱ्यांना देतात.
कृषी पर्यटनाची संकल्पना राबवताना शेततळ्यात मत्स्यपालन, पर्यटकांसाठी मासेमारी अनुभव, झोपडीसारखी निवास व्यवस्था, सेंद्रिय शेती यावर त्यांनी भर दिला आहे. उच्चशिक्षित पिढीच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देत खांबे कुटुंब शेतीत नवसंजीवनी निर्माण करत आहे. त्यांनी १ हजार पक्ष्यांचे कुक्कूटपालन देखील सुरू केले आहे.
सेंद्रिय शेतीचा स्वतंत्र गट स्थापन करून पर्यावरणपूरक शेतीचा प्रचार आणि प्रसार ते करीत आहेत. पारंपरिक आंबा-काजूशिवाय बाराही महिने उत्पन्न देणारी शेती आणि त्यास पूरक व्यवसायांची रचना त्यांनी उभारली आहे.
अनंत खांबे यांची ही संकल्पना आणि कृती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी वाटचाल आहे. शासनाच्या विविध योजनांचा योग्य वापर करून शेती व्यवसायाला समृद्धीकडे घेऊन जाण्याचा मार्ग त्यांनी दाखवला आहे.