स्वच्छ सर्वेक्षणात यश | वेंगुर्ला नगरपरिषदेनं केला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार !

पश्चिम विभागात १६ वा व महाराष्ट्रात ८ वा क्रमांक
Edited by: दीपेश परब
Published on: October 19, 2022 20:56 PM
views 186  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेने नुकताच स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये पंधरा हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटामध्ये पश्चिम विभागात १६ वा व महाराष्ट्रात ८ वा क्रमांक प्राप्त केला आहे. यानिमित्त आज नगरपरिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

नगरपरिषदेस हे यश प्राप्त होण्यामध्ये शहरातील नागरिक, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविका  यांच्यासह न.प. च्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भरीव कामगिरी केली. त्यामुळे नागरिकांसह हे सर्व श्रेय तुमचे आहे. यापुढेही सर्वांनी यापेक्षाही चांगले काम करुया व देशात चांगला क्रमांक मिळवूया, असे यावेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी डॉ. सोंडगे यांनी कार्यालयीन अधीक्षक, सफाई कर्मचारी, महिला सफाई कर्मचारी, मुकादम, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी, घंटा गाडीवरील कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी अशा प्रत्येक विभागातील एका व्यक्तीचा सत्कार करण्यात आला.यामध्ये प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, बाबुराव जाधव, संतोष जाधव, मेघना घाटकर, नेहा पाटणकर, तुळशीदास नाईक इत्यादींचा सत्कार करण्यात आला.