
सिंधुदुर्गनगरी : प्रशासकीय सेवेत येण्यासाठी अभ्यासाचा नियमित सराव चालू ठेवा. वाचनामध्ये सातत्य ठेवा. प्रशासकीय सेवांबाबतच्या परीक्षांची सखोल माहिती घेण्याबरोबरच चालू घडामोडींवर अधिक लक्ष केंद्रीत करा. त्यासाठी वृत्तपत्रांचे नियमितपणे वाचन करा. कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा. अपयश आले तरी खचून जावू नका. नेहमी सकारात्मक विचार करत रहा. झालेल्या चुकांचा शोध घ्या आणि जिद्दीने प्रयत्न करत रहा. यश हमखास मिळेल, असा सल्ला प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर यांनी दिला.
मूळ केरळच्या असणाऱ्या व सध्या जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. असलेल्या करिष्मा नायर यांनी विद्यार्थ्यांना फेसबुक लाईव्ह व्दारे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, तहसिलदार श्रीधर पाटील उपस्थित होते.
श्रीम. नायर म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला कोणत्या क्षेत्राची आवड आहे, हे प्रथम निश्चित करा.त्या दृष्टीने प्रयत्न सुरु करा. आपल्या आवडीचे विषय व आपल्याला सोपे जाणारे विषय निवडून त्याप्रमाणे अभ्यासाची दिशा ठरवावी. प्रशासकीय सेवेत येण्यासाठी अभ्यासक्रमांची माहिती करुन घ्यावी. त्यासाठी आवश्यक माहितीपूर्ण पुस्तके व इतर बाबींची यादी तयार करावी. अभ्यास करताना लिखाणावर जास्तीत जास्त्ास भर द्यावा. अभ्यास करताना येणऱ्या छोट्या मोठ्या शंकांचे, अडचणींचे मार्गदर्शकांकडून तातडीने निरसन करुन घ्यावे. समूहातील विद्यार्थ्यांबरोबर चर्चा कराव्यात. भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये मुख्य परीक्षेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करावे. त्यासाठी जुन्या प्रश्न पत्रिकांचा आधार घ्यावा.
ज्यांनी या परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे, त्यांचे ऑनलाईन व्हीडिओ पहावेत. पुस्तकांच्या वाचनातून स्वत:ची टिपणे (नोटस्) काढावीत. या टिपणांमधून महत्वाची, अतिमहत्त्वाची टिपणे याचे वर्गीकरण करुन त्यानुसार अभ्यास करावा, असे सांगून श्रीमती नायर पुढे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांचे पेपर लिखाण करताना प्रथम प्रश्न समजून घ्यावेत. प्रश्नांची उत्तरे मुद्देसूदपणे लिहावीत. ज्या प्रश्नांच्या उत्तराची बरोबर असल्याची स्वत:ला खात्री आहे, असे प्रश्न तातडीने सोडवावेत.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, जिल्ह्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जावेत, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रेरणा अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन, त्यांनी केलेल्या यशस्वी वाटचालीचे अनुभव परीक्षार्थींना सांगितले जातात. यामधून स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा मिळते. अभ्यास करताना येणाऱ्या शंका, अडचणींचे निराकरण यामाध्यामातून करुन घेता येते. तहसिलदार श्रीधर पाटील यांनी आभार मानले.