मनमानी करणाऱ्या खासगी बस चालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दणका !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 15, 2023 15:27 PM
views 1407  views

कुडाळ : मुंबई ते सावंतवाडी असे खाजगी बसचे तिकीट देऊन दमदाटी करत सावंतवाडी शहरात बस न नेता झाराप झिरो पॉईंट येथे प्रवाशांना उतरविणाऱ्या खाजगी बस चालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग चे अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दणका दिला आहे.


सावंतवाडी शहरात जाणाऱ्या प्रवाशांना खाजगी बस चालक झाराप झिरो पॉईंट येथे उतरवत असल्याच्या घटना वाढल्या होत्या याला आळा बसावा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत पथक तैनात करण्यात आले असून हे पथक सकाळी 5 ते 11 या कालावधीत मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे थांबणाऱ्या खाजगी बस  व त्या गाडीतून उतरणाऱ्या परवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून चौकशी व त्याची नोंद करत आहेत. व सावंतवाडी शहरात जाणारा प्रवासी असल्यास गाडी सावंतवाडीच्या दिशेने रवाना करत आहेत.


आज पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी बस तपासणी मोहिमेत शुक्रवारी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमित नायकवडी, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक प्रवीण सातारे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक संदीप सावंत, वाहन चालक वैभव राणे यांनी आज या मोहिमेत सहभाग घेतला.


 तर दुसरीकडे दाम दुपटीने सणासुदीच्या काळात प्रवाशांना लुटणाऱ्या खाजगी बस चालकांना चाप बसावा यासाठी  महाराष्ट्र राज्य परिवहन कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या दरपत्रकानुसार तिकीट आकारणे बंधन कारक करण्यात आले आहे. त्यामुळे झारा झिरो पॉईंट येथे उतरणाऱ्या प्रवाशांची बस तिकीट जादा आकारले आहे का? त्या प्रवासाला सावंतवाडीला जायचं आहे का याबाबत चौकशी केली जात आहे.