पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे व्यसनमुक्ती केंद्राच्या मागणीचे निवेदन सादर !

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्ग यांचा पुढाकार
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 06, 2023 19:05 PM
views 163  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने त्यांना व्यसनमुक्ती केंद्राच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबईकर आणि जिल्हा व्यसनमुक्त समितीच्या प्रतिनिधी मेघा गांगण यांनी सदर निवेदन पालकमंत्र्यांकडे सुपूर्द केले.

 आपल्या निवेदनात ते म्हणतात की, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात वाढत्या व्यसनाधीनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, विविध पातळीवर काम करणे गरजेचे आहे. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून याकडे अधिक लक्ष केंद्रीत करावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा प्रसार, प्रचार व प्रबोधन होणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता पालकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई आणि गोपुरी आश्रमाच्या वतीने गेले पंधरा वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्तीसाठी कार्य सुरु आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच, व्यसनांच्या विक्रीवर असलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे सर्वत्र नशेच्या पदार्थांची विक्री केली जात आहे. यांचा परीणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. परिणाम मात्र कुटुंबाला, समाजाला भोगावे लागतात. अनेक महिलांना हिंसाचाराला, अत्याचाराला सामोरे जावे लागते आहे.  या सर्व गोष्टीचा विचार आपण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून करावा आणि व्यसनमुक्तीसाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यावेत, जिल्ह्यात एकही व्यसनमुक्ती केंद्र नाही. गोपुरी आश्रमाच्यावतीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. आपण या प्रस्तावाच्या मंजूरीसाठी प्रयत्न करावेत, तसेच युवकांसाठी काही नवीन रोजगार प्रकल्प आणावेत, म्हणजे तरुणाई व्यसनांपासून दूर राहील, परावृत्त होईल, असे निवेदन देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक,  गोपुरी आश्रमाच्या संचालक अर्पिता मुंबरकर आणि जिल्हा व्यसनमुक्त समितीच्या प्रतिनिधी मेघा गांगण यांनी मागणी केली.