
वैभववाडी : संविधान सैनिक संघ, महाराष्ट्र राज्य आणि डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट कल्याण, मुंबई यांच्यावतीने वेंगसर गावचे माजी सरपंच सुभाष कांबळे यांना यंदाचा राज्यस्तरीय 'संविधान सैनिक गौरव पुरस्कार २०२२' प्रदान करण्यात आला. दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी कल्याण येथे संविधान दिनादिवशी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी मराठी चित्रपट अभिनेते व निर्माते अरुण नलावडे यांच्याहस्ते पुरस्कार देऊन श्री. कांबळे यांना गौरविण्यात आले.
सुभाष कांबळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. तब्बल २१ वर्षे ते वैभववाडी बौध्द सेवा संघाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.संघाच्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. वेंगसर गावाचे सरपंच म्हणून गावाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. जिल्हातील सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. कल्याण येथे मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. शाल, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी संविधान सैनिक संघ रजिस्टर महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक संघ प्रमुख डॉ. रवींद्र जाधव, डॉ. सुरेखा जाधव, कार्याध्यक्ष सुनिता खैरनार, संविधान अभ्यासक नुरखाँ पठाण, बाळासाहेब रायते आदी उपस्थित होते. हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.