
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयात फिजीशियन, न्युरोलॉजीस्टसह रिक्त पद भरावी यासाठी सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून आंदोलन छेडलं होत. 27 मार्च रोजी आरोग्यमंत्र्यांसह बैठकीस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित केले. ही बैठक पुढे ढकलत 2 एप्रिल तारीख दिली अन् आता तीही बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आरोग्य सुविधांचा 'प्रकाश' उपजिल्हा रुग्णालयावर पडणार की उपचाराविंना रूग्णालय अंधारातच राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन, हृदयरोग तज्ञ व न्यूरोलॉजिस्ट कायमस्वरुपी मिळावा याकरिता छेडण्यात आलेल्या आंदोलनात शासनाकडून सकारात्मक चर्चा करत लेखी पत्र देत आरोग्यमंत्र्यांसह बैठकीच आश्वासन दिलं होतं. आरोग्य संदर्भात विविध विषयांवर आरोग्यमत्र्यांसोबत स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यासह तातडीची बैठक आयोजित केली होती. मात्र, ती काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. आज २ एप्रिल रोजी ती होणार होती. मात्र, २७ मार्चनंतर 2 एप्रिलची बैठक पुढे ढकलली. यामुळे सावंतवाडीकरांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. डॉक्टर अभावी लोकांचे जीव जात असताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना कसलच सोयर सुतक नाही का ? असा प्रश्न विचारला जात आहे. येथील नेतेमंडळी, आरोग्य प्रशासन हॉस्पिटलच्या प्रश्नांसंदर्भात व उपचाराविना जाणाऱ्या जीवांविषय किती गंभीर आहेत हे लक्षात येतं असून येत्या दोन दिवसात शहरातील नागरिक, गावातील ग्रामस्थ, विविध संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत.
दरम्यान, आज पुन्हा हृदय विकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू उप जिल्हा रुग्णालयात झाला आहे. डॉक्टरांचा अभाव व न मिळणाऱ्या सुविधा बघता आमदार दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यावर ठोस उपाययोजना करणार की रोजची मृतांची संख्या अन् असुविधांच गाऱ्हाणं ऐकणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.