जयहिंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला रानभाज्यांच्या स्वाद

Edited by:
Published on: August 12, 2024 14:04 PM
views 141  views

साळगाव : श्रावण महिना सुरू होताच निसर्गाचे सौंदर्य दाटून येते, आणि त्यासोबतच रानभाज्यांचा अनोखा आस्वाद मिळतो. या नैसर्गिक रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीला समजावे, तसेच त्यांच्या आरोग्यवर्धक गुणांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स (हॉटेल मॅनेजमेंट), साळगाव येथे आरोग्यदायी, शक्तीवर्धक, पौष्टिक आणि चविष्ट पावसाळी (श्रावणी) रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला लोकमान्य एज्युकेशनचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, बीएड कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. मयूर शारबिद्रे, आणि जयहिंद कॉलेजचे प्राचार्य अमेय महाजन यांची उपस्थिती लाभली होती. या पाककला स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध शेफ टॅरी डीसा, ऋषिकेश सूर्याजी, आणि योगेंद्र मराठे यांनी केले.

प्रदर्शनात टाकळा, भारंग, कुरुडू, पेवागा, घोटवेल, फोडशी, कणकीचे कोंब, चीवारी कोंब, आणि सुरण यांसारख्या दुर्मिळ रानभाज्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यासोबतच, प्रत्येक भाजीचे आरोग्यवर्धक फायदे देखील प्रदर्शनात दर्शवण्यात आले. या भाज्यांवर आधारित पाककला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक रेसिपीजचे मॉर्डन पद्धतीने सादरीकरण केले, ज्यामध्ये 20 पेक्षा जास्त प्रकारचे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ तयार करण्यात आले.

प्रवीण प्रभू केळुसकर यांनी या रानभाज्यांचे आयुर्वेदिक महत्त्व विषद केले आणि त्यांच्यातील औषधी गुणधर्मांचे लाभ पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “नैसर्गिक रानभाज्या या प्रत्येकासाठी हेल्थ टॉनिक ठरत आहेत,” असे ते म्हणाले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म, आणि त्यांच्या पाककलेतील उपयोगाची सखोल माहिती मिळाली. प्रदर्शित रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.