
वेंगुर्ला : शिरोडा गावातील सेंट्रल प्रायमरी स्कूल, शिरोड नं. १ या शाळेच्या लगत निवासी इमारत आहे. या इमारतीच्या सांडपाण्याचा निचरा योग्यरित्या होत नाही. ते सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येते. इमारतीचा काही भाग हा शाळेच्या आवारात येत असल्याने सदर सांडपाण्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा शाळेतील विदयार्थ्यांना खुप त्रास होतो. विदयार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश परब व राजन धानजी यांनी गटविकास अधिकारी वेंगुर्ला यांच्याकडे केली आहे.
या सांडपाण्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीच्या वासामुळे शाळेमध्ये दोन वर्गखोल्या बंद अवस्थेत ठेवण्यात आले आहेत. तसेच शेजारील लगतची इमारत ही नगररचनाकार यांच्या प्लॅनिंग नुसार होत नाही हे दिसून येते. यामुळे विदयार्थ्याच्या आरोग्यावर व शैक्षणिक यावर वाईट परिणाम होताना दिसून येत आहे. सदरील इमारतीची चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत शाळेकडूनही वारंवार शिरोडा ग्रामपंचायतकडे तक्रार करण्यात आली आहे. यामुळे याठिकाणी स्वतः पहाणी करून शालेय विदयार्थ्यांना व तेथील राहणाऱ्या निवासी लोकांना योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.