आई वडिलांच्या संस्काराचे फलित करून विद्यार्थ्यांनी देशपातळीवर झळकावे : मनिष दळवी

Edited by: दिपेश परब
Published on: January 05, 2024 19:25 PM
views 94  views

वेंगुर्ला : महाविद्यालय सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांचे कलागुण दाखविण्याचे उपक्रम राबविते. विद्यार्थ्यांनी सक्षम व जबाबदार नागरिक बना. आई वडिलांच्या सुसंस्कारांचे फलित करून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन करावे. बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची व वेंगुर्ल्याची ओळख देख पातळीवर निर्माण करा. त्यासाठी तुम्ही स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होऊन विविध क्षेत्रात अधिकारी बना. पुढच्या काळात पर्यटन, उद्योजक व व्यवसाय याच्या माध्यमातून वेंगुर्ला विकासाच्याबाबतीत उंचीवर जाणार आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय विद्यार्थी आयोजित सांस्कृतिक महोत्सव २०२४ ‘युवा स्पंदन‘ कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाच्या विविध वेशभूषा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, युवा स्पंदन समितीचे चेअरमन प्रा.वामन गावडे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, उपसरपंच पपू परब, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा.दिलीप शितोळे, प्रा.डी.बी.राणे, विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ सचिव फाल्गुनी नार्वेकर, मंथन देसाई, तन्वी तुळसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सचिन परूळकर यांनी केले.