
दोडामार्ग : कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो , असा आत्मविश्वास बाळगून कार्याला सुरुवात केल्यास यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन विवेकानंद नाईक यांनी केले. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते.
आपल्या भाषणात ते म्हणाले की , 'आत्मविश्वास व मेहनत त्या क्षेत्रातील नवनवीन शिकून घेण्याची कला , त्याचा योग्य वापर, पैशांची योग्य गुंतवणूक, त्या क्षेत्रातील आदर्श व्यक्तीचा शोध घेऊन त्यानुसार आपले व्यक्तिमत्व घडवत गेल्यास आपला व्यवसाय व उद्योग भरभराटीला येऊ शकतो.आपले कष्ट पाहून अनेक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीची मदत करू शकतात. त्यासाठी विश्वास महत्त्वाचा असतो , तो आपणच निर्माण करावयाचा असतो. तो आपल्या वागण्या बोलण्यातून दिसून येतो. अशा पद्धतीने जीवन जगण्याचा किंवा उद्योग व्यवसाय करण्याचा प्रयत्न करा' , असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष सावंत होते.त्यांनी अण्णाभाऊ साठे , लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा पट विद्यार्थ्यांना सांगून तसेच जीवन जगण्याचा प्रयत्न करा असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश गवस यांनी केले .प्रास्ताविक प्राध्यापिका दर्शनी कोटकर यांनी केले .तसेच उपस्थित यांचे आभार संकल्प सावंत यांनी मांडले. यावेळी हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रमुख रोहन बागकर यांच्या सह सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.