विद्यार्थ्यांनी श्रमदानातून रस्ता केला खड्डेमुक्त | निद्रिस्त प्रशासन व राज्यकर्त्यांच्या डोळ्यात घातलं अंजण

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 24, 2023 12:28 PM
views 507  views

वैभववाडी : कुसुर नवभारत हायस्कूल मधील शाळकरी विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गावातील कुसुर-तिरवडे रस्त्यावरील खड्डे मातीने बुजविले आहेत.या प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षक यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.जे काम प्रशासन व लोकप्रतिनिधी करायल हवं ते विद्यार्थ्यांनी करून एकप्रकारे या निद्रिस्त व्यवस्थेच्या डोळ्यात अंजण घालत आहे.

तालुक्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा कुसूर-गवळवाडी-तिरवडे हा मार्ग आहे.मात्र हा मार्ग मागील काही वर्षांपासून खड्डेमय झाला आहे.या मार्गावर अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत.तसेच काही भागात रस्ता उखडला आहे.त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे सद्यस्थितीत धोकादायक बनले आहे.प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही.अखेर गावातील नवभारत हायस्कूल या विद्यालयाने या  मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला.प्रशालेतील २५विद्यार्थी व शिक्षक यांनी मिळून आजपासून खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे.आज  कुसुर मळेवाडी येथील खड्डे मातीने बुजविले.तसेच ज्याठिकाणी रस्ता उखडून खडी वर आली होती ती बाजूला करून मार्ग वाहतुकीसाठी निर्धोक केला आहे.

या श्रमदानात शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सचिन गणपतराव क्षीरसागर, शिक्षक भरत वसंत पाटील ,अजित अण्णासाब डीग्रजे,राजेंद्र तुकाराम झलगे,भरत वसंत कुंभार व प्रशालेचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थी व शिक्षक यांनी केलेल्या या श्रमदानाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आतातरी जागे होऊन हा मार्गाचे नुतनीकरण करावं अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.