
दापोली : दापोली तालुक्यातील दाभोळ येथून दापोलीकडे येणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात घालून बस थांबवून प्रवाशांचा जीव वाचविला असल्याची घटना आज सकाळी १०.४५ चे सुमारास वळणे येथे घडली.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल भाऊराव धोत्रे हे त्यांच्या ताब्यातील बस क्रमांक एमएच.१४.बीटी.१४८८ घेवून दाभोळ ते दापोली येत असताना त्यांची बस वळणे येथे आली असता, त्यांनी गाडीचा ब्रेक मारला असता बस थांबली नाही. या बसचे ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने गाडी थांबविण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या गटारात बस उतरवली. या अपघातात बसमधून प्रवास करणारे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आसे असून एसटी बसचे अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची खबर दापोली पोलीस ठाण्यात चालक राहुल भाऊराव धोत्रे यांनी दिली असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड करत आहेत.