मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या बंदोबस्तासाठी वेंगुर्ला न. प. ची धडक कारवाई

Edited by: दिपेश परब
Published on: September 13, 2023 14:01 PM
views 144  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीला आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने या मोकाट जनावरे व त्यांच्या मालकांवर कारवाई पाऊल उचलले असून या जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा संबंधित मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी परितोष कंकळ यांनी जाहीर केले आहे.

नगरपरिषद हद्दीत मोकाट जनावरे रस्‍त्‍यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी येवून वाहतुक व्‍यवस्‍थेसाठी व नागरीकांना त्रास होत असलेबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्‍त झालेल्‍या आहेत. त्‍यानुसार सदर तक्रारीची दखल घेवून नगरपरिषदेने आज (१३ सप्टेंबर) पासून शहरात मोकाट जनावरे पकडण्‍याची मोहिम सुरु केलेली आहे. या मोहिमेमध्‍ये नगरपरिषदेने पहिल्या दिवशी ३ मोकाट जनावरे पकडलेली असून ती सद्यस्थितीत नगरपरिषदेच्‍या कोंडवाडयामध्‍ये ठेवण्‍यात आलेली आहेत. नगरपरिषदेमार्फत पकडण्‍यात आलेल्‍या जनावरांची ओळख पटवून दंड भरुन ती घेवून जावयाची आहे. तसेच यापुढे शहरात नागरीकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये अन्यथा संबंधित मालकावर कायदेशीर कारवाई करणेत येईल अशी सूचना नगरपरिषदेमार्फत करण्‍यात आल्या आहेत.