
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधान परिषद रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे व कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम १८ मे २०२६ पासून जाहीर केला असून त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज केली असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, रत्नागिरी जिल्हाधिकारी हे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून या मतदारसंघात जिल्ह्यातील एकूण २०७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ९८ पुरुष व १०९ महिला मतदारांचा समावेश असल्याची माहितीही त्यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, सोमवार दि. २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि. १ जून २०२६ आहे. मंगळवार दि. २ जून रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल, तर गुरुवार दि. ४ जून २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान गुरुवार दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून मतमोजणी सोमवार दि. २२ जून २०२६ रोजी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरुवार दि. २५ जून २०२६ रोजी पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रभाकर सावंत, श्री अणावकर आदी उपस्थित होते.










