LIVE UPDATES

प्रशासनाने अर्धवेळ मटका कसा खेळायचा ? याच नियोजन करावे

गुरुदास गवंडेंचा खोचक टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: May 21, 2026 21:11 PM
views 49  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासनात चाललंय तरी काय ? मुख्य कार्यकारी अधिकारी लोकप्रतिनिधी येणार म्हणून गाडीची हवा सोडतात तर यांच प्रशासन 'मटका' किंगकडे वाटचाल करतय हे असं चाललं तर जिल्ह्याचा विकास तरी कसा होणार ? असा सवाल सरपंच सेवा संघ सावंतवाडीचे माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केलाय. तसेच जिल्हा प्रशासनाकडून अशांसाठी अर्धवेळ मटका कसा खेळायचा ? याच मनोरंजन  म्हणून नियोजन करावे असाही खोचक टोला हाणला आहे. 

ते म्हणाले, तालुक्यात आज पंचायत समितीच्या मासिक सभेच्या बैठकीमध्ये एक कर्मचारी मटका जुगाराचे आकडे पाहताना दिसला. या जिल्ह्यात ज्या दिवसापासून प्रशासक लागू झाला त्या दिवसापासून या जिल्ह्यातील अधिकारी हे मनमानी कारभार करतच आलेत. गेल्या दोन वर्षात सावंतवाडी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी किती वेळा ग्रामपंचायतचा दप्तर तपासणी केली‌? हे सांगावं. आज लोकप्रतिनिधींना पंचायत समितीमध्ये प्रश्न उपस्थित करावे लागतात. त्यामुळे अधिकाऱ्यांचीच काम लोकप्रतिनिधींना सांगावी लागत असतील तर त्या ठिकाणी आयएस ,आयपीएस होऊन काय उपयोग ? असा सवाल केला. तर सभा चालू असताना त्या ठिकाणी  मटक्याचे आकडे पाहिले जाता‌त. लोकप्रतिधींना अधिकारी फारसे मनावर घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना आज ज्या परिस्थितींना सामोरे जावं लागतं हे पाहिलं गेलं तर आपण या अधिकाऱ्यांना पार्ट टाईम बिजनेस म्हणून त्यांची जिल्ह्यातून निवड करावी कदाचित मटका, जुगार खेळून तरी काम होतात का ? हे बघाव. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मोठ्या पोट तिडकीने सांगत आहेत की या जिल्ह्यात अवैध धंद्यांना माफी नाही. मग, अशाच पद्धतीने या जिल्ह्यात हे चालू राहिलं तर कसं होणार ? काही दिवसांपूर्वी कुडाळ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांनी सभेकडे पाठ फिरवली. त्यामुळे या जिल्ह्यातील अधिकारी हे लोकप्रतिनिधींपेक्षा कोणीतरी मोठे आहेत असंच यावरून दिसतं. अधिकाऱ्यांवर, पोलीस यंत्रणेवर वचक राहिलेला नाही. 

सर्वसामान्य लोकांची काम दोन दोन वर्ष होत नाहीत. शासन परिपत्रक काढत वाळू देणार परंतु आजपर्यंत प्रधानमंत्री घरकुल योजनेतील जिल्ह्यातील लाभार्थ्याला वाळू मिळाली नाही. मागच्या दोन-तीन वर्षात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जो भ्रष्टाचार फोफावला तो अशाच प्रकारांमुळे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अर्धवेळ मटका कसा खेळायचा ? याचं मनोरंजन  म्हणून नियोजन करावे अशीही खोचक टीका श्री गवंडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.