LIVE UPDATES

शिवकालीन मर्दानी खेळ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: May 21, 2026 21:34 PM
views 22  views

सावंतवाडी : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान सिंधुदुर्ग विभाग आणि राष्ट्रवीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीतील कळसुलकर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन मर्दानी खेळ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एकूण ८४ जणांनी सहभाग घेतला.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उदघाटन प्रसंगी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै,  सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे, राष्ट्रवीर सेवा संघाचे संस्थापक नितीन शेलार(मामा), सौ पूजा शेलार, सह्याद्री प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष सुनिल राऊळ आदी उपस्थित होते. शैलेश पै यांनी शिवकालीन मर्दानी खेळ ही एक विद्या असून त्याला इतिहास आहे. आत्मसंरक्षणाचे प्रभावी तंत्र असलेल्या मैदानी खेळातून शारीरिक तंदुरीस्थीसह मानसिक धैर्य वाढते. तसेच या प्रेरणादायी खेळातून शिस्त आत्मविश्वास निर्माण होऊन शौर्य संस्कार होत असल्याचे सांगितले. यावेळी नितीन शेलार यांनी शिवकालीन मैदानी खेळाचे प्रशिक्षण अधोरेखित करून या प्रशिक्षणात लाठी काठी, तलवारबाजी व  आत्मसंरक्षणाचे प्रभावी तंत्र याचे सखोल प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले. सुनिल राऊळ यांनीही या प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मर्दानी खेळांची ओळख व्हावी या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित केल्याचे सांगून अशा प्रशिक्षणातून आत्मसंरक्षणाची जाणीव निर्माण होत असून भविष्यात अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली. यावेळी भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा तसेच शिवकालीन शस्त्रांची पूजा केल्यानंतर ध्येयमंत्र व प्रेरणा मंत्राने या शिबिराला प्रारंभ झाला.

सावंतवाडीतील कळसुलकर हायस्कूल येथे सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत गुरुवार २८ मे पर्यंत हे शिवकालीन मर्दानी खेळ शिबिर चालणार आहे. यावेळी सिंधूमित्र प्रतिष्ठानचे डॉ. मुग्धा ठाकरे, भार्गवराम शिरोडकर, भगवान रेडकर, आनंद मेस्त्री, प्रसाद सापळे, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे रितेश राऊळ, सुरज सावंत, प्रकाश राऊळ, वसंत तावडे, एकनाथ गुरव, शुभम नाईक, संपदा राणे, हार्दिक तावडे, आदी उपस्थित होते.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन शेलार, सूत्रसंचालन रितेश राऊळ तर आभार डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी मानले.