
सावंतवाडी : स्वतःच्या कार्यालयाच्या बाजूला असलेली झाडे वन विभागाचे अधिकारी तात्काळ तोडतात. परंतु, तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेली त्यांच्याच मालकीची धोकादायक झाडे तोडण्यासाठी वेळकाढूपणा काढतात, हा कुठला न्याय ? असा सवाल पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांना केला. वाहतुकीस धोकादायक ठरणारी झाडे हटवण्याबाबत तत्काळ पावले उचला अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक आज सभापती सुस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जाधव, जितेंद्र गांवकर, महेश धुरी, मायकल डिसोजा, प्रशांत सुकी, प्राजक्ता केळुसकर आदींसह सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी विभागावर आढावा घेण्यात आला. यामध्ये उपस्थित सर्वच पंचायत समिती सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत अधिकारी वर्गांना धारेवर धरले. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील वनविभागाच्या धोकादायक झाडांबाबत प्रश्न चर्चेत आला. यावेळी वन विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहून सभागृहाची परवानगी न घेताच अर्ध्यावरून निघून गेल्याने उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्याला संपर्क साधत त्याला पुनश्च सभागृहात बोलावून घेत खडेबोल सुनावण्यात आले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सभागृहात उपस्थित करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावरून सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांना सभागृहामध्ये पाचारण करण्यात आले. श्री. पाटील हे सभागृहात येताच धोकादायक ठरणाऱ्या अंबोली घाटातील झाडांबाबत मायकल डिसोजा यांनी प्रश्न उपस्थित केला. अलीकडेच एका कारवर झाड कोसळून अपघात झाल्याचे स्पष्टीकरण देत घाटातील धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी तात्काळ हटवा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी तशा प्रकारचा अहवाल तयार केला असल्याचे श्री. पाटील यांनी सभागृहाला सांगितले. परंतु, कायद्यावर बोट ठेवल्याने उपसभापती श्री. मुळीक हे आक्रमक झाले. वनविभाग आपल्या कार्यालयाच्या बाजूला असलेली झाडे तात्काळ हटवतो. परंतु, लोकांच्या जीविकास धोकादायक ठरणारी झाडे हटवण्यासाठी ते कायद्यावर बोट ठेवून वेळ काढतात. हा न्याय अत्यंत चुकीचा असून तालुक्यात ज्या ठिकाणी अशी धोकादायक झाडे आहेत ती हटवण्याबाबत तात्काळ पाऊल उचला अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच वन विभागाने गतवर्षी नेमकी किती झाडे लावली आणि किती जगली ? याचा अहवाल आम्हाला सादर करा असेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे बीएसएनएलच्या नेटवर्क अभावी गावोगावी मोठी समस्या निर्माण झाली आहे. बरेच मोबाईल टॉवर हे बंद असून काही टॉवर लाईट गेल्यावर बंद पडतात त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याबाबत तात्काळ सुधारणा करा अशी मागणी सभागृहामध्ये सर्व सदस्यांनी केली. यावेळी या प्रश्नावर सर्व्हे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सदस्य जितेंद्र गावकर यांनी चांगले सुनावले. सभागृहाला समर्पक उत्तरे द्या, जर नेटवर्क नसेल तर मोबाईलला रिचार्ज करून उपयोग काय ? जोपर्यंत खासगी टॉवर गावोगावी उभे नव्हते त्यावेळी बीएसएनएलचे नेटवर्क सुरळीत सुरू होते. परंतु, खासगी टॉवर उभे झाले त्यावेळी बीएसएनएलचे नेटवर्क कोलमडले. यामागे गौडबंगाल काय ? असा संशय ही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सातार्डा येथील वीज पुरवठ्याचा प्रश्न मांडताना उदय पारिपत्ये यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सातार्डा भागात वीज पोलच नसून बांबूचा आधार घेऊन सर्व्हिस लाईन ओढली गेल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. सातार्डा, रेडी आणि वेंगुर्ला परिसरात कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. दोन महिने सातत्याने लक्ष वेधूनही महावितरणचे अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. पावसाळा तोंडावर आला असतानाही मान्सूनपूर्व कामे झाली नसल्याने सदस्यांनी संताप नोंदवला. यावर उपसभापती गौरव मूळिक यांनी कंत्राटदार काम करत नसल्याचे सांगत, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ बोलावून घेण्याचे आदेश दिले.










