डायल ११२ वर खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध कुडाळात कारवाई

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 10, 2025 20:09 PM
views 13  views

सिंधुदुर्गनगरी : शासनाने नागरीकांना आपतकालीन कालावधीमध्ये तातडीची मदत मिळावी याकरीता डायल 112 ही आपतकालीन जलत प्रतिसाद सुविधा कार्यान्वित केलेली आहे. डायल 112 वर नागरीकांनी पोलीस मदत मिळण्याकरीता संपर्क साधल्यावर त्याची तात्काळ दखल पोलीस विभागाकडून घेवुन नागरीकांना पोलीस मदत पुरविण्यात येते. सदर सुविधेमुळे बऱ्याच नागरीकांना अपघातात / नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच इतर आपत्तकालीन परिस्थितीमध्ये तात्काळ पोलीस मदत पुरविण्यात आलेली असून बऱ्याच नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेचे रक्षण करण्यात आलेले आहे. परंतु काही नागरीक हे वरील सुविधेचा दुरुपयोग करुन डायल 112 वर खोटी माहीती देऊन पोलीस प्रशासनाचा वेळेचा व मनुष्यबळाचा दुरुपयोग करतात.

दि. 09.05.2025 रोजी डायल 112 वर “इंडीया को उडाना है ईनशा अल्लाह, मेरे भाईजान आ रहे है” असा फोन आला. सद्या भारत पाकिस्तान या देशाचे युदध सुरु असल्याने सदर फोनचा कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी गंभीर दखल घेवून तात्काळ सदर फोन करणाऱ्या इसमाचा शोध सुरु केला. त्यावेळी सदर फोन करणारा इसमाचे नाव *नितीन सहदेव तांबे, वय 50 वर्षे, रा. भडगांव बुद्रुक टेंबवाडीता, कुडाळ जि. सिंधुदुर्ग असे असल्याचे निष्पन्न* झाल्याने त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरची माहीती ही खोडसाळपणाने दिलेली असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत सदर इसमावर कुडाळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

या गुन्हयाचा तपास करण्याची मंजुरी मा. न्यायालयाकडून घेण्यात आलेली असुन सदर आरोपीत याचेविरुदध त्याने केलेल्या गुन्हयाबाबत तपास करण्यात येत आहे.सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग श्री कृषिकेश रावले मा. उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार मंगेश जाधव, जनार्दन झारापकर, संजय कदम, रुपेश सारंग, योगेश मांजरेकर यांनी केलेली आहे. डायल ११२ ही सुविधा नागरीकांना त्यांचे आपतकालीन कालावधीमध्ये तात्काळ पोलीस मदत मिळावी या हेतुने शासनाने सुरु केलेली आहे. त्यामुळे कोणीही सुविधेचा दुरुपयो करुन खोटी माहीती पोलीस प्रशासनाचा देवु नये अन्यथा अशा इसमांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केलेले आहे.