
वेंगुर्ले : मोटर व्हेईकल अँक्टचे उल्लंघन करणाऱ्या ३२ जणांवर वेंगुर्ले पोलीसांकडून कारवाई करत न्यायालयामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. वेंगुर्ले तालुक्यात वाहातुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस मनोज परूळेकर व गौरव परब यांनी कारवाई केली.
या कारवाईत भारतीय दंड संहिता कलम २८३ नुसार टेम्पो, रिक्षा व मोटर सायकल अशा १४ वाहनांवर, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन वाहातुक करणाऱ्या कलम २७९ नुसार टेम्पो, डम्पर व मोटर सायकल अशा ३ जणांवर, मोटर अधिनियम १८५ चे उल्लंघन म्हणजे दारू पिऊन दारूच्या अंमलखाली वाहन चालविणाऱ्या १२ मोटर सायकलवर, मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालविणाऱ्या १ टेम्पो तर नशेत वाहन चालविणाऱ्या दोघांवर उपविधी ८४ अन्वये दारूच्या नशेत आढळलेले दोघांवर वाहातुक पोलीसांनी कारवाई करीत हि प्रकरणे न्यायालयात पाठविली होती.
या सर्व प्रकरणांत वाहतुक नियमांचे उल्लंघन प्रकरणी सर्वावर न्यायालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दंड रक्कम भरून घेण्यात आली आहे. गणेशोत्सव काळातही वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच ट्रीपलसीट वाहन चालवणाऱ्या व कानाला मोबाईल लावून संभाषण करणाऱ्या करणाऱ्यांवरही आता ट्रफिक पोलीसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अल्पवयीन मुले वाहन चालवितांना आढळल्यास त्यांचेवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.
वेंगुर्ले तालुक्यातील वाहनधारक चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे. तसेच वेंगुर्ले शहरात नगरपरीषद व पोलिसांकडून पार्किंगसाठी केलेल्या जागांच्या ठिकाणी वाहने उभी करावीत. वहातुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला वाहने उभी करु नयेत. त्यासाठी सर्व प्रकारच्या वाहन धारकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.