विकासाची गंगा थांबवा, पण आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करा : बाबुराव धुरी

Edited by: संदीप देसाई
Published on: September 06, 2023 16:53 PM
views 104  views

दोडामार्ग : तालुक्याची आरोग्य यंत्रणा अपुऱ्या कर्मचारी वर्गावर कार्यरत आहे, त्यात आपले काम तन्मयतेने करणाऱ्या या कर्मचारी व डॉक्टर वर्गाचे गेले सात ते आठ महिने  वेतन न झाल्याने त्यांचे संसार मात्र मोडकळीस आल्याचे चित्र आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आक्रमक होत सोमवार पर्यंत या कर्मचारी व डॉक्टर यांचे वेतन अदा करावे अन्यथा मंगळापासून आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.


या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणाले की, दोडामार्ग रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी यांचे वेतन गेले सात ते आठ महिने शासनाने अदा केलेले नाही, अशातच आता चतुर्थीचा सण तोंडावर असून या कर्मचारी व डॉक्टर वर्गाला बाप्पा पावणे गरजेचे आहे, विकासाची गंगा आणणाऱ्या शासनाने ही गंगा आता कोणीतरी थांबवणे गरजेचे असून त्यातून या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे गरजेचे असल्याची उपरोधिक टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे


ते पुढे म्हणाले या कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीकडे शासनाने लक्ष न दिल्यास व सोमवार पर्यंत या कर्मचाऱ्यांचे वेतन अदान न केल्यास मंगळवारपासून तीव्र आंदोलन  छेडणार आहे, या ठिकाणी तात्काळ वैद्यकीय अधिकारी दिला जाईल असे आश्वासन सरकारमधील काही घटकांनी यापूर्वीच दिलेले होते, रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी व स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे यांची सावंतवाडी येथे बदली होऊन आज सात महिने उलटले तरी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी मिळत नाही हे त्यांचे अपयशच आहे. त्यामुळे हे तालुक्यातील महत्त्वाचे ग्रामीण रुग्णालय असून सुद्धा प्रसूती व इतर कारणांसाठी महिला वर्गाला इतर दवाखाने व खाजगी रुग्णालय यांचा आसरा घ्यावा लागतो आहे ही गोष्ट लाजिरवाणी असून यावर शासनाने योग्य ती पावले उचलावीत असेही त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.