सिंधुदुर्गनगरी : आपल्या भारत देशातील वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणेकरिता राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम आपल्या देशात 1952 पासून राबविणेत येत आहे. या कार्यक्रम अंतर्गत दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे करिता पाळणा लांबविण्याच्या तात्पुरत्या पध्दती उदा- तांबी, गर्भनिरोधक गोळ्या, निरोध, तांतडीच्या गोळ्या, (इमर्जन्सी पिल्स) इ साधने उपलब्ध आहेत. तसेच पाळणा थांबविणेसाठी टाका व बिनटाका या स्त्रीशस्त्रक्रिया व बिनटाका पध्दतीच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे दिली आहे.
जिल्हयात नसबंदी शस्त्रक्रियागृह असलेल्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दरमहा बिनटाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबीरांचे आयोजन करण्यात येते. तसेच आवश्यकतेप्रमाणे प्रा आ केंद्राच्या ठिकाणी स्त्री नसबंदी टाका शस्त्रक्रिया व पुरुष नसबंदी बिनटाका शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्याकरीता आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत पात्र लाभार्थीना प्रवृत्त केले जाते व त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर मोबदला दिला जातो.
सिंधुदुर्ग जिल्ह्याकरीता सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत एकूण 1900 चे भौतिक उद्दीष्ट प्राप्त झालेले आहे. माहे डिसेंबर अखेर एकूण 860 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या असून 45.26% उद्दीष्ट साध्य झालेले आहे. यामध्ये एकूण 855 स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया व 5 पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 16 स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबीरांचे आयोजन आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे.
दि. 24 व 25 जानेवारी 2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये कणकवली, वैभववाडी, देवगड व मालवण तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते. यावेळी 01 टाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया व 30 बिनटाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबीराकरीता डॉ. राजेश्वर उबाळे, स्त्रीरोग तज्ञ व खाजगी वैद्यकिय व्यावसाईक यांनी सर्जन म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. हेमा तायशेटे व डॉ. मनिषा होगले यांनी भूलतज्ञ म्हणून कामकाज पाहिले. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. रमेश कर्तस्कर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, डॉ. प्रणोती इंगवले, तालुका आरोग्य अधिकारी, कणकवली, डॉ. विशाल रेड्डी, वैद्यकिय अधिक्षक, कणकवली तसेच आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे व जयदीप वावळीये यांनी विशेष मेहनत घेतली.