
सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलने 'जागतिक वसुंधरा दिन' मोठ्या अनोख्या पद्धतीने साजरा केला. प्रशालेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांना कोलगाव येथील जंगलात नेण्यात आले. प्रशालेच्या या उपक्रमांतर्गत कुणकेरीच्या ग्रामस्थांना वन वणव्याबाबत व वनसंवर्धनाबाबत जागरूक करण्यात आले.
वनातील पक्षी व प्राण्यांना जलप्राप्तीसाठी, त्यांची तहान भागावी याकरिता जलस्रोत म्हणून छोटासे दोन पाणवठे तयार केले गेले. हे पाणवठे तयार करण्यासाठी तेथील वनरक्षक श्री. भोजणे तसेच त्यांचे वरिष्ठ श्री. राणे व दोन सहकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना जंगलात कोणते पक्षी व प्राणी आहेत, तसेच कोणकोणत्या सर्प जाती जंगलात आढळतात हे सांगितले. या वन्य प्राण्यांना शांत वातावरणाची गरज असते, परंतु मानवी उपद्रवांमुळे त्या प्राण्यांना किती त्रास होतो यामुळे ते प्राणी मानवी वस्तीमध्येही प्रवेश करतात आणि हे सर्व टाळायचे असल्यास जंगलात लागणारे वणव्यांचे प्रमाण टाळणे व वनाचे संरक्षण करणे मानवाच्या हातात आहे. याकरिता जनजागृती करणे फार महत्त्वाचे आहे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रशालेचे संचालक रूजुल पाटणकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सौ. जागृती प्रभू तेंडोलकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
वनहद्द व मानवी वस्ती यांच्यामध्ये जनजागृती करणारे बॅनर्स लावून जनजागृतीचा पहिला टप्पा वनविभागाच्या पदाधिकऱ्यांसमवेत पार पाडण्यात आला. जंगलात जे बॅनर लावले गेले त्यात धरती वाचवली तर आपण वाचू कारण या धरतीवर उपलब्ध असलेल्या वनांमुळेच आपल्याला प्राणवायू प्राप्त होतो असा जनजागृती करणारा संदेश विद्यार्थ्यांनी समाजाला दिला. तसेच, प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गावातल्या लोकांशी संवाद साधत वनवणव्यांविषयी जागरूकता व वसुंधरा हिरवीगार ठेवण्यासाठी वृक्षारोपण, वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था इत्यादी विषयांवर चर्चा केली. त्यावेळी कुणकेरीच्या सरपंच्या सौ. सोनिया सावंत यांनी विद्यार्थ्यांचे तोंड गोड करत, दर वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावा व त्याचे संवर्धन करा असा मोलाचा सल्ला दिला. त्याचबरोबर जंगलात छोटया दोन रिंग बसवून पाणवठे तयार केले गेले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी झाडे लावण्याची व त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेतली.
येत्या पावसाळ्यात जास्तीत जास्त झाडे लावण्याची व त्यांची वाढ सुनिश्चित करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दर्शवली. वनविभाग कर्मचारी, सरपंच तसेच माजी सरपंच तसेच ग्रामस्थ यांनी या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर वनविभागाने मुलांना खाऊवाटप केले व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. या कर्मक्रमासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका सौ. जागृती प्रभू टेंडोलकर, तसेच सहा. शिक्षिका कु. उमा बोयन व कपिल कांबळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. वनविभागाशी पत्रव्यवहार करून समन्वय साधण्याचे कार्य प्रशालेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी केले. अशाप्रकारे , आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
त्याचप्रमाणे प्रशालेतील सहा. शिक्षिका सौ. ग्रिष्मा सावंत यांनी परिपाठाच्या तासाला देखील विद्यार्थ्यांना आपण जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यामागचे कारण सांगितले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.