
सिंधुदुर्गनगरी : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून चाललेला रोजचा राजकीय तमाशा दुर्घटना घटनेपेक्षाही अधिक वेदनादायी असून राज्य सरकारने "त्या" ठिकाणावर जिल्हा बाहेरील नेत्यांकडून अनावश्यक होणारे पाहणीचे पर्यटन दौरे बंद करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर "त्या" ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून झालेला "राडा" हा निषेधार्हच असून उबाठा पक्ष संघटनेने किल्ल्यावर काढलेला मोर्चा देखील नादान व बेजबाबदारपणाचेच लक्षण होते. वास्तविक आमदार वैभव नाईकांनी पुतळा पडल्याचा निषेध जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून नोंदविणे क्रमप्राप्त होते मात्र तो मोर्चा महाराजांच्या किल्ल्यावर नेमका कोणत्या हेतूने वळविण्यात आला याचाही खुलासा त्यांनी करणे गरजेचे आहे. महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेनंतर त्या ठिकाणी होणारे जिल्हा बाहेरील नेत्यांचे रोजचे दौरे हे अनावश्यक व प्रशासकीय यंत्रणेला खास करून पोलीस बांधवांना वेठिस धरणारे ठरत आहेत.बरं हे नेते पडलेल्या पुतळ्याची पाहणी करून करणार काय आहेत? त्यांच्या पाहणी दौऱ्याने नेमकं साध्य काय होणार आहे, की सणासुदीच्या तोंडावर जिल्ह्यातील वातावरण तापवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे हे जिल्ह्यातील जनता सर्वस्वी जाणत असून पुतळा दुर्घटना प्रकारणी नेत्यांच्या बलिशपणाला जनता अक्षरशः वैतागली आहे. महाराजांचा पुतळा,स्मारकाचे सुशोभिकरण व पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त आणि नेव्ही डे इव्हेंटसाठी केलेली हेलिपॅड कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होऊन शासन निधीचा जणू लुटममारच केली गेली आहे. मात्र हे सगळं घडत असताना आता मोर्चा काढणारे,pwd कार्यालय फोडणारे व किल्यावर राडा करणारे हे सर्वच फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत का बसले होते याचे उत्तर आधी जिल्ह्यातील जनतेला देणे आवश्यक आहे.किल्यावर राजकीय पोळी भाजून
नादान लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता वेशीवर तर टांगलीच पण दुर्घटनेचा राजकीय मुद्दा बनवत त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवून देशाचीही अब्रू घालवली आहे. दुर्घटनेबाबत जोशींवर चौकशी अंतिम कारवाई होईलच मात्र महाराजांचा पुतळा, हेलिपॅड व स्मारकाचे सुशोभिकरण कामांत झालेल्या अपहारीत रक्कमेची वसुली व दोषी ठेकेदारांवर कारवाई कधी होणार आहे याचे उत्तर सत्ताधारी राज्यकर्त्यांनी द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.