आठ महिन्यापूर्वीचा पुतळा कोसळणे दुर्दैवी

शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रताप भोसले
Edited by: साहिल बागवे
Published on: August 27, 2024 07:38 AM
views 227  views

कणकवली : मालवण राजकोट येथे अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला, ही दुर्दैवी बाब आहे. याबाबत संबंधित शासकीय विभागाने योग्य ती चौकशी करून कुणी दोषी असल्यास कारवाई देखील करावी, अशी मागणी शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांनी केली आहे.

श्री. भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाजांच्या कार्याचे स्मरण होण्यासाठी राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारण्यात आला, ही शिवप्रेमींसाठी नक्कीच आनंदाची, अभिमानाची बाब होती. मात्र, अवघ्या आठ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला असल्याने त्याच्या दर्जाविषयी शिवप्रेमींमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे घडल्या प्रकाराची काटेकोरपणे चौकशी व्हायलाच हवी.

शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांची जिल्ह्यात ठिकठिकाणी स्मारके आहेत. एखादी घटना घडल्यानंतर सतर्कता दाखविण्यापेक्षा सद्यास्थितीत जिल्ह्यात असणारी महापुरुषांची सर्व स्मारके सुस्थितीत आहेत का, याचीही तपासणी संबंधित शासकीय विभागांनी करावी. तसेच यापुढे कोणत्याही महापुरुषाचे स्मारक उभारताना दर्जा, जागा आदींसह तांत्रिक बाबींचीही तपासणी करावी, असे भोसले यांनी म्हटले आहे.