
सावर्डे : बालवयात केलेले संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. भारत देश महासत्ता बनवण्यासाठी स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण असून त्याची सुरुवात भारताच्या खेड्यांपासून व शाळा शाळा पासून होणे आवश्यक आहे. आजच्या मोबाईलच्या दुनियेत विद्यार्थी मोबाईलच्या व्यसनांमध्ये गुरफटला जातोय हे नक्कीच भूषणावर नाही याची जाणीव करून देतानाच वैयक्तिक, सामाजिक, शारीरिक व मानसिक स्वच्छतेचे महात्मा गांधींचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन गांधी रिसर्च फाउंडेशन कडून केले जाते असे प्रतिपादन राज्य समन्वयक गिरीश कुळकर्णी यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव च्यावतीने आयोजित गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्पर्धे अंतर्गत राज्य समन्वयक गिरीश कुलकर्णी विश्वजीत पाटील व संजय जाधव या मूल्यांकन समितीने विद्यालयाला भेट दिली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी मूल्यांकन समितीचे स्वागत केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाने स्वच्छते विषयक आयोजित पथनाट्य, प्रभात फेरी, गाव पानवटे स्वच्छता, स्मशानभूमी स्वच्छता पार्थना स्थळे स्वच्छता, प्लास्टिक मुक्तीसाठी राबवलेले विविध उपक्रम, समाजात जाणीव जागृतीसाठी आयोजित केलेल्या विविध उपक्रमा बरोबरच प्रसिद्धीसाठी प्रभावीपणे वर्तमानपत्रे व समाज माध्यमाचा केलेला वापर यांचे कौतुक केले.
महात्मा गांधींचे विचार पिढ्यानपिढ्या उपयुक्त ठरावेत म्हणून त्यांनी अंगीकारलेल्या स्वच्छते विषयक जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी व पर्यावरण रक्षण यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, नागरिकांना, विशेषतः तरुणांना, स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी,स्वच्छतेविषयी नवकल्पना आणून,सकारात्मक बदल घडवणे व गाव, शहर आणि शाळा-विद्यालयांमध्ये स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजवणे आणि त्याचा सातत्याने प्रचार करण्यासाठी,महात्मा गांधींनी दिलेल्या "स्वच्छ भारत" आणि "स्वावलंबन" या संकल्पनांना पुढे घेऊन जाण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.