
वेंगुर्ला : माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या कित्येक वर्षापासून मान्य होत नसल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी पुणे येथे राज्यस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष अनिल राणे, सचिव गजानन नानचे व कार्याध्यक्ष प्रदीप सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत. सदर प्रश्न तातडीने निकाली काढले जातील असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने, राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांच्या नेतृत्वाखाली १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी भव्य मोर्चाचे आयोजन पुणे येथील शनिवार वाडा ते शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे करण्यात आले असून राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे
तसेच दिनांक २० फेब्रुवारी २०२४ पासून राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी काम बंद आंदोलन करतील असा इशारा राज्य महामंडळाच्या वतीने देण्यात आला आहे. ७ जानेवारी रोजी सावंतवाडी येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राज्य अधिवेशन संपन्न झाले. त्यावेळी सदर अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांनी प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मोर्चा काढणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री या संबंधित विभागांना राज्य महामंडळाच्या वतीने देण्यात आले आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या १०/२०/३० च्या लाभाची योजना त्वरित मंजूर करावी, आकृतीबंध संदर्भात नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेला अहवाल मंजूर करून शिक्षकेतरांच्या भरतीस त्वरित परवानगी मिळावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ वर्षांचा दुसरा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा, पदवीधारक ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन व वेतन श्रेणी संरक्षण मिळावे, विनाअनुदानित तुकडी वरील विद्यार्थी संख्या शिक्षकेतर पदे मंजूर करताना ग्राह्य धरावी आदी प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्यात येतील असे आश्वासन शिक्षण मंत्री यांनी दिले होते परंतु याबाबत शासनाकडून कोणतीही सकारात्मक हालचाल होताना दिसून येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शासन स्तरावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्याने पुणे येथील शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त कार्यालयावर १२ फेब्रुवारी रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असून दिनांक २० फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व शाळातील शिक्षकेतर कर्मचारी काम बंद आंदोलन करतील तरी जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुणे येथील महामोर्चा मध्ये सहभागी होऊन शाळा बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.