राज्य कलाप्रदर्शनात विक्रांत बोथरे यांच्या कलाकृतीची निवड

Edited by: मनोज पवार
Published on: December 14, 2024 19:49 PM
views 248  views

चिपळूण  : कलासंचालनालय  मुंबईच्या  वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनासाठी व्यावसायिक या विभागामध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व शिल्पकार यांचा सहभाग असतो. हे प्रदर्शन शासनामार्फत घेण्यात येत असून या प्रदर्शना मध्ये कलाकाराची कलाकृतीची निवड होणे हि खूप मोठी व महत्वाची गोष्ट असते.

यावर्षी घेण्यात आलेल्या ६४व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी  कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कलामहाविद्यालयातील  व्यावसायिक विभागातून चित्रकार प्रा. विक्रांत दिपक बोथरे यांच्या चित्राची निवड झाली आहे.  प्रा. विक्रांत बोथरे हे सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट मधे कलाअध्यापनाचे कार्य करत आहेत. त्याचबरोबर ते व्यावसायिक चित्रकार व लेखक देखील आहेत. चित्रकलेच्या क्षेत्रात ते सर्व माध्यमात काम करतात.जसे की,ऑइल कलर, अॅक्रीलिक कलर,वॉटर कलर,पोस्टर कलर, ऑइल पेस्टल, सॉफ्ट पेस्टल,कलर पेन्सिल, चारकोल अशा अनेक माध्यमात त्यांनी पोर्ट्रेट( व्यक्तिचित्र), कंपोझिशन( रचनाचित्र),लँडस्केप( निसर्ग चित्र),abstract पेंटिंग( अमूर्त चित्र)असे विविध विषय हाताळले आहेत.व्यक्तीचित्रणावर त्यांचे खास प्रभूत्व आहे.

यावर्षी निवड झालेल्या त्यांच्या चित्राचा विषय Divine Energy With Nature( निसर्गातील दैवी ऊर्जा)असा आहे. चित्रकार प्रा. विक्रांत बोथरे यांना निसर्ग व अध्यात्म याविषयी कुतूहल असल्याने निसर्गातील सजीव घटक म्हणजेच गाय (cow )व कावळा ( crow) यांचे सर्जनशील (creative)आकार घेऊन रंग व कुंचल्याच्या साह्याने चित्रित केले आहे.  या वर्षीचे ६४वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर कलादालनात दि.४ फेब्रुवारी २०२५ ते १० फेब्रुवारी २०२५ या दरम्यान या ठिकाणी संपन्न होणार आहे.

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार  प्रकाश अर्जुन राजेशिर्के,  पूजाताई निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव  यांनी प्राध्यापक विक्रांत बोथरे यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.