
सावंतवाडी : आंबोलीतील वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे धबधब्यांच्या परिसरात बऱ्याच प्रमाणात स्टॉल उभारण्यात आले आहेत. गरमागरम चहा, भजी, कणसं, मॅगी असे पदार्थ इथं विकले जातात. पावसात भिजून कुडकुडणारे पर्यटक गरमगरम खाद्यपदार्थांवर तुटून पडायला या स्टॉलचा आसरा घेतात. पण, स्टॉलमुळे होणारं ट्राफिक व वाढती पर्यटकांची संख्या पाहता वनविभाग प्रशासनानं धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्य धबधब्याच्या परिसरातील सात स्टॉल बुधवारी आंबोली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटविले. यावेळी आमच्यावरच अन्याय का ? असा संतप्त सवाल स्टॉलधारकांनी केला. तर स्टॉल हटविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून वरीष्ठांची परवानगी आली की इतरही सर्व स्टॉल हटविण्यात येणार असल्याचे आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी सांगितले.
धबधब्याच्या लगत असलेल्या रस्त्याच्या बाजूला स्थानिकांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल, बाजूला साचणारा कचरा तसेच दररोजची होणारी वाहतुक कोंडी या मुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं समोर येत आहे. गेली कित्येक वर्षे आंबोली, चौकुळ व परिसरातील स्थानिक स्टॉलधारक आपला व्यवसाय याठिकाणी करत आहेत. स्टॉलवाल्यांची गर्दी आंबोलीत झाली आहे. विकेंड व्यतिरिक्त पर्यटकांच्या गाड्यांमूळे वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. वनविभागाची ही कार्यवाही काही अंशी योग्यही असेल, आहे. मात्र, रोज पडणारी दरड, आंबोली घाटाची मागील २५ वर्षांत झालेली दुर्दशा पाहता वनखात आंबोलीच्या संवर्धनासाठी कधी पुढाकार घेणार ? डोंगर भागात पाणी अडवण्यासाठी खड्डे मारणार हे डिपार्टमेंट घाट दरीत कोसळण्यापासून वाचवण्यासाठी कधी प्रयत्न कराणर ? हा प्रश्न कायम आहे. नव्यानेच आलेले उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी याबाबत ठोस भूमिका घेऊन स्टॉल हटाव प्रमाणेच आंबोली घाटाच्या संवर्धनासाठी देखील तेवढ्याच कार्यतत्परपणे पुढाकार घेतील अशी अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहे.