
वैभववाडी : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीने हटविलेल्या स्टाॅलच्या ठिकाणी पुन्हा स्टाॅल उभे राहिले आहेत.यावर यासंदर्भात आता नगरपंचायत प्रशासन तहसिलदारांना पत्र देणार असल्याची खात्रीशीर माहीती आहे. महसूल विभाग यावर काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
नगरपंचायतीने लाखो रूपये खर्च करून शहरात चार महिन्यांपुर्वी स्टॉल हटाव मोहीम राबविली होती. परंतु आता पुन्हा शहरात स्टॉल उभे राहु लागले आहेत.यापुर्वी बाजारपेठेतील रस्त्यांच्या दुतर्फा शेकडो स्टॉल उभे करण्यात आले होते.जुना कोकिसरे रस्ता,सांगुळवाडी रस्ता,सार्वजनिक भुखंड,आणि शौचालयानजीकच्या भुखंडावर अनेक स्टॉल होते. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीने शहरातील विकासकामांना अडथळा होत असल्याचे कारण देत हे स्टॉल हटविण्याचा निर्णय घेतला. स्टॉलधारकांना पर्यायी जागा द्यावी त्यानंतर स्टॉल हटविण्यात यावे अशी मागणी स्टॉलधारकांची होती. त्याकरीता स्टॉलधारकांनी दोन दिवस नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण देखील केले होते.तसेच आंदोलन देखील केले. परंतु नगरपंचायत प्रशासनाने २३ मार्च २०२३ रोजी स्टॉल हटाव मोहीम निश्चित केली.स्टॉलधारकांनी प्रचंड विरोध दर्शविला. मात्र पोलीस बंदोबस्तात शहरातील स्टॉल हटविण्यात आले. त्यानंतर स्टॉलधारकांना पर्यायी जागा देण्यासंदर्भात नगरपंचायतीकडुन प्रयत्न सुरू झाले.सार्वजनिक शौचालयानजीक काही स्टॉलधारकांसाठी जागा निश्चित केली. तेथे भुमिपूजन देखील झालं होतं. परंतु काहीच्या तक्रारीनंतर तहसिलदारांनी ती जागा महसुलच्या मालकीची असल्याचे सांगत तेथे बांधकाम करण्यास परवानगी नाकारली. शहरात मोकळ्या दिसणारी इतर जागा देखील महसुल विभागाची आहे. त्यामुळे तेथे पर्यायी व्यवस्था होईल कि नाही याची शाश्वती नसल्यामुळे आता स्टॉलधारकांनी शहरात पुर्वी ज्या ज्या ठिकाणी स्टॉल होते तेथे स्टॉल उभे करण्यास सुरूवात केली आहे.
आतापर्यत शहरात तीस ते पस्तीस स्टॉल उभे करण्यात आले आहेत. उर्वरित स्टॉलधारक देखील स्टॉल उभे करण्याच्या तयारीत आहेत.शहरात स्टॉल उभे राहत असताना नगरपंचायत मात्र बघ्याची भुमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र दुसरीकडे नगरपंचायत प्रशासनाकडुन तहसिलदारांना एक पत्र देण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहीती आहे. ज्या ठिकाणी स्टॉल उभे राहत आहेत. ती जागा महसुल प्रशासनाची आहे. त्यासंदर्भातच हा पत्रव्यवहार केला जाणार आहे.या संदर्भात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्याशी बोलले असता ते म्हणाले, शहरात स्टालॅ वाढले ही वस्तुस्थिती आहे. नगरपंचायतीने कारवाई करुनही पुन्हा स्टाॅल उभे राहिले आहेत.या संदर्भात तहसीलदार यांना पत्रव्यवहार करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
महसूलच्या जागेतच पुन्हा स्टाॅल
स्टाॅलधारकांच्या पुनर्वसनासाठी १ मे २०२३रोजी सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी एका राजकीय पक्षाच्यावतीने भुमिपूजन करण्यात आले होते.याठिकाणी स्टाॅल उभारण्याकरिता सिमेंटचा चौथरा बांधण्यात आला होता.मात्र महसूल विभागाने ही जागा आपली असून याठिकाणी कोणतेही बांधकाम करता येणार नाही असं संबंधित जागेवर नोटीस लावले.त्याठिकाणी काम करण्यास बंदी घातली.मात्र आता त्याच ठिकाणी स्टाॅल उभारले गेले आहेत.मात्र महसूल विभागाकडून त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही.त्यामुळे या विभागाची भूमिका संभ्रमात टाकणारी ठरत आहे.