एसटीच्या गाड्यांना थांबा द्या अन्यथा आंदोलन

ठाकरे शिवसेनेचा इशारा
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 03, 2024 08:15 AM
views 410  views

वैभववाडी : भुईबावडा घाटमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना कुसूर उंबर्डे व भुईबावडा येथे थांबा मिळावा.एसटी प्रशासनाने याची दखल न घेतल्यास ठाकरे शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा नेते रज्जब रमदुल यांनी दिला आहे. कोकणसाद लाईव्हच्या वृत्तानंतर येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

     तळेरे -गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे.याकरिता करुळ घाट वाहतूकीस बंद करण्यात आला. पुढील दोन महिने या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे या मार्गावरील एसटीसह अन्य प्रवासी वाहतूक भुईबावडामार्गे वळविण्यात आली आहे. २२जानेवारी २०२४ पासून ही वाहतूक या मार्गाने सुरू आहे. एसटीच्याही १६लांब पल्ल्याच्या गाड्या या मार्गावरून ये जा करीत आहेत. परंतू या गाड्यांना कुसूर, उंबर्डे व भुईबावडा येथे थांबा नाही. वैभववाडी नंतर थेट गगनबावडा थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे उंबर्डे -भुईबावडासह आजूबाजूच्या गावांना या गाड्यांचा उपयोग होत नाही. येथील प्रवाशांना उलटे वैभववाडीत यावे लागत आहे. त्यामुळे या मार्गाने जाणा-या गाड्यांना कुसूर उंबर्डे व येथे थांबा मिळावा. एसटी प्रशासनाने तात्काळ हा बदल करावा अशी मागणी ठाकरे शिवसेने केली आहे. अन्यथा एसटी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.