
सावंतवाडी : जनतेच्या तीव्र रोषानंतर आणि सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांच्या इशाऱ्यानंतर एसटी महामंडळाने मुख्य बस स्थानक व वेंगुर्ला बस बस्थानकातील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रवाशांना त्रास होत असलेल्या या खड्ड्यांमुळे धोका वाढला होता. या समस्येवर तात्पुरता तोडगा काढत, आठ दिवसांत सिमेंट काँक्रीटिंग करून हे खड्डे कायमस्वरूपी बुजवण्यात येणार आहे.
आज दुपारी खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना रवी जाधव यांनी त्याठिकाणी उपस्थित राहत कामाची पाहणी केली. सुरुवातीला खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेली माती पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. ती तातडीने काढून टाकायला लावत योग्य प्रमाणात खडी टाकून घेतली. रवी जाधव म्हणाले, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हे काम योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. तात्पुरते खड्डे बुजवल्यानंतर पुढील ८ दिवसांत सिमेंट काँक्रीटचा वापर करून हे खड्डे कायमस्वरूपी बुजवले जातील असा शब्द एसटी महामंडळाकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी महामंडळाने सामाजिक बांधिलकीच्या या भूमिकेची दखल घेत त्वरित कार्यवाही केल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.










