
देवगड : वाहकाने फूस लावून पळविलेल्या मुलीची भाजप महिला कार्यकर्त्यांकडून सुटका करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेला हा प्रकार आता उघडकीस आला. देवगड एस.टी. आगारातील एका विवाहित वाहकाने देवगड तालुक्यातील एका गावातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळउन त्याच्या सोबत नेले होते. त्यानंतर तिला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तिला सुखरूप सोडवून तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
दोन वर्षांपूर्वी, देवगड तालुक्यातील एका गावातील मुलीला देवगड एस.टी. आगारातील वाहकाने फूस लावून पळवले होते. या संपूर्ण प्रकारात त्या वाहकाची पहिली पत्नी देखील सहभागी होती. काही दिवसांनी मुलीच्या लक्षात आले की, तिची फसवणूक झाली आहे. त्या व्यक्तीचा तिच्याशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नाही. सुटण्यासाठी तिने वारंवार अनेक प्रयत्न देखील केले, मात्र वाहक व त्याच्या पत्नीच्या दबावामुळे ती अयशस्वी ठरली.
पीडित मुलगी देवगड येथे नजरकैदेत असल्याची माहिती तिच्या बहिणीला मिळाली. त्यानंतर तिने मुलीचा ठावठिकाणा शोधण्याचा निर्णय घेतला. मुलीचा पत्ता मिळाल्यावर तिने भाजपाच्या नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांची भेट घेतली व संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळस्कर, भाजप देवगड मंडळ अध्यक्ष उषःकला केळुसकर, भाजप देवगड-जामसंडे महिला शहर अध्यक्ष तन्वी शिंदे, पीडित मुलीचे आई-वडील आणि तिची बहीण यांनी मिळून संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवली. त्यानंतर पीडित मुलीला सोडवून देवगड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी घडलेला हा प्रकार काल उघडकीस आला.
कायदेशीर कारवाई व पुढील कार्यवाही देवगड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने कायदेशीर कारवाई केली. नंतर पीडित मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
तसेच, संबंधित वाहकाची तातडीने देवगड एस.टी. स्थानकातून जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी देवगडमधील ग्रामस्थांकडून होत आहे. या मोहिमेत विशेष सहकार्य सुब्रा सारंग, शैलेश सारंग, ॲड. प्रीती चव्हाण व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी केले होते.