
सावंतवाडी : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात केवळ पदवी मिळवून चालणार नाही तर, बाजारातील आपली किंमत वाढवण्यासाठी नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. एसएसआय कॉम्प्युटर' सारख्या खासगी संस्थांनी कौशल्य विकास क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. आज तंत्रज्ञान अत्यंत वेगाने बदलत असून 'एआय ' सारख्या प्रगत तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांनी अपडेट राहणे आवश्यक आहे. कायम शिकण्याची वृत्ती आणि स्वतःला अपडेट ठेवल्यास यश नक्कीच मिळेल, असा विश्वास सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला.जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण आणि सन २०२५-२६ च्या नवीन तुकड्यांच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, प्रशासकीय कामकाज सांभाळताना अनेकदा थेट जनसंपर्क कमी होतो, मात्र अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांशी संवाद साधता येतो. प्रशासनासोबतच जेव्हा अशा खासगी संस्था सामाजिक विकासासाठी काम करतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाचा सर्वांगीण विकास होतो. एसएसआय संस्थेने २० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करून समाजासाठी मोठे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कतृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, "महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला घराच्या मर्यादा ओलांडून स्वतःच्या विकासासाठी आणि समाजासाठी काम करत आहेत, याचा अभिमान वाटतो. अनेक आव्हाने असतानाही महिला जिद्दीने पुढे येत आहेत, ही सकारात्मक बाब आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. भविष्यात नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. मुग्धा ठाकरे, तुळस मतदार संघाच्या जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ, युवा उद्योजिका ऐश्वर्या शेठ कोरगांवकर यांच्यावतीने माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर या महिलांना सन्मानित करण्यात आले. तसेच बाल धावपटू कु. कबीर हेरेकर याचाही विशेष सन्मान करण्यात आला. या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत केंद्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कविता नाईक, सुखदा नाईक, मिताली केदार तसेच जाहिरात व्यवस्थापन व एसएसआय कम्प्युटरच्या ब्रँड अँबॅसेडर श्रीम. अनुष्का वर्दम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर सिद्धी निखार्गे, पुर्वा कासार, भाग्यश्री राऊळ, संदेश गवस व संजना मातोंडकर या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एस एस आय कॉम्प्युटरचे चेअरमन रघुनाथ तानावडे व डॉ. सौ. गौरी तानावडे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर रघुनाथ तानावडे यांनी प्रास्ताविक पर भाषणात संस्थेची एकंदरीत वाटचाल विशद केली.
यावेळी सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील, स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, बॅ. नाथ पै संस्थानचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, इंद्रायणी शिक्षण संस्थानचे भूपतसेन सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. यावेळी एस. एस. आय कॉम्प्युटरचे विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










