
सावंतवाडी : तालुक्यातील जि.प.प्रा.शा. नेमळे क्रमांक १ या शाळेच्या शैक्षणिक परंपरेत अभिमानाचा नवा मानबिंदू जोडला गेला आहे. येथील होतकरू व बुद्धिमान विद्यार्थी जय परशुराम ठाकर याची प्रतिष्ठेच्या नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून, त्याच्या या यशामुळे शाळा व गावाचा मान उंचावला आहे.
जयने हे उल्लेखनीय यश शाळेतील समर्पित व कर्तव्यदक्ष शिक्षिका श्रीमती चंद्रकला भोसले मॅडम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपादन केले. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे जयचा हा प्रवास अधिक सक्षम व यशस्वी ठरला.
या अभिमानास्पद यशाबद्दल पंचायत समिती सावंतवाडीचे उपसभापती गौरव मुळीक तसेच माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर यांच्या हस्ते जय ठाकर व भोसले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील राऊळ, मुख्याध्यापिका श्रीमती गावकर, शाळेतील इतर शिक्षकवृंद तसेच जयचे वडील. परशुराम ठाकर आणि आई श्रीमती प्रांजल ठाकर हे अभिमानाने उपस्थित होते. जयच्या या यशामुळे संपूर्ण नेमळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.










