युद्ध नको बुद्ध हवाय...

सर्वोदय नगरवासीयांची शांततेसाठी विश्व प्रार्थना
Edited by: विनायक गांवस
Published on: March 20, 2026 17:23 PM
views 25  views

सावंतवाडी : आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. अवघे विश्व आज विज्ञानमय झाले आहे. आपले जीवन विज्ञानाने सुखी केले असले तरी मात्र विज्ञानाने अणुबॉम्बसारख्या काही विनाशक गोष्टीही तयार केल्या आहेत. आज इराण - इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे ते कधीही मानवतेला धरून नाही. या युद्धामुळे अनेक निष्पाप बालके आणि अनेक निरपराध माणसं यांचे बळी जात आहेत. हे सारे पाहून अतीव दुःख होते. या युद्धामुळे कधीही कोणाचेच भले होणार नाही. उलट आज जगात अशांतता पसरत असून आपल्या घरापर्यंत त्याची झळ पोहोचली आहे. त्यामुळे जगाच्या कल्याणासाठी युद्ध नको बुद्ध हवाय, असे प्रतिपादन सर्वोदय नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी व्यक्त केले.

 सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर येथील उद्यानात वैश्विक शांततेसाठी विश्व प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री. राऊळ बोलत होते. यावेळी या प्रभागाचे नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक, रहिवासी संघाचे सौ. मेघना राऊळ, सौ. दिशा कामत, गुरुदत्त कामत, ॲड. प्रकाश परब, विद्याधर तावडे, ॲड. रुजुल पाटणकर, गुंडू साटेलकर, सौ. अपेक्षा साटेलकर, श्री. राणे, श्री. गावीत, गणपती काळकुंद्रीकर, प्रा. डॉ. एस. एम. बुवा, प्रा. रूपेश पाटील, प्रा. सौ. पूनम नाईक, डुमिंग डिसोजा, सौ. डिसोजा, हेमंत बांदेकर, सौ. शीतल गोंदावळे, सौ. रोशनी गावडे, सौ.अमृता धुरी - साटेलकर, सौ. बार्देस्कर, सौ. संध्या मठकर, सौ. स्वरा मठकर, नफिस राजगुरू तसेच सर्वोदय नगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने होते. यावेळी प्रा. पाटील यांनी वैश्विक शांततेसाठी व कल्याणासाठी विश्वशांती प्रार्थना सादर केली. तसेच सर्व उपस्थित नागरिकांनी मेणबत्ती पेटवून व मौन बाळगून या युद्धात जीव गमावलेल्या निरपराधांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघना राऊळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिशा कामत यांनी केले.