
कुडाळ : कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांच्या वतीने कोकण विभागीय (विभाग ४) आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदणी आणि स्पर्धा दिनांक ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्टावर संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांतील एकूण ३३ महाविद्यालये सहभागी होत आहेत. स्पर्धेत सुमारे १०६ मुलगे व ६० मुली असे एकूण १६६ स्पर्धक आपला सहभाग नोंदवणार आहेत.
या निमित्ताने महाविद्यालय परिसरात खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळणार असून, विभागीय पातळीवरील खेळाडूंना आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची आंतर विभागीय विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे, ज्यामुळे त्यांना पुढील पातळीवर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाच्या, कोकण विभागीय क्रीडा समित्तीचे सचिव प्रा. चंद्रकांत नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थ्यांनी विशेष तयारी केली आहे.
आत्तापर्यंतच्या नोंदींनुसार सहभागी स्पर्धकांच्या संख्येबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या स्पर्धेला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे. त्याचप्रमाणे या स्पर्धेला क्रीडाप्रेमी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.










