खेळातून दर्जेदार खेळाडू निर्माण होतील : नितेश राणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 05, 2024 17:10 PM
views 95  views

वैभववाडी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबतच खेळांचे विशेष कौशल्य असते.या भागातील खेळाडु नेहमीच चमकदार कामगिरी करीत असतात. शालेय स्तरावर होत असलेल्या क्रीडास्पर्धामधून दर्जेदार खेळाडु तयार होऊ शकतात. शिक्षकांनी शिक्षणासोबतच खेळासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे.  या स्पर्धासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी येथे केले.

 तालुकास्तरीय बाल, कला, क्रीडा स्पर्धा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे आयोजन नाधवडे येथील केंद्रशाळेत करण्यात आले असुन या महोत्सवाचे उद्‌घाटन आमदार श्री राणे यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, बाप्पी मांजरेकर, सुधीर नकाशे, प्राची तावडे,मुकुंद शिनगारे,शैलजा पांचाळ, बाबा कोकाटे, विशाल पावसकर,श्रीराम पावसकर आदी उपस्थित होते.

श्री.राणे म्हणाले  शालेय पातळीवर होत असलेल्या क्रीडा स्पर्धा ही विद्यार्थ्यासाठी एक प्रकारे पर्वणी आहे.या विद्यार्थ्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ असुन निर्माण करण्यात आलेले आहे.ग्रामीण भागात अनेक गुणवंत खेळाडु आहेत.मैदानी खेळात तर ग्रामीण भागातील खेळाडुचा दर्जा कायमच उल्लेखनीय राहीलेला आहे.विद्यार्थ्यानी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करावे असे आवाहन त्यांनी केले.ही स्पर्धा अधिक चांगली होण्यासाठी आणि खेळाडूंना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कायम तत्पर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, मागण्या देखील शासन स्तरावरून सोडवण्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील आहे. असे देखील श्री.राणे यांनी स्पष्ट केले.

गटशिक्षणाधिकारी शिनगारे म्हणाले, यावर्षीची जिल्हा जनरल चॅम्पियनशिप निश्चित वैभववाडी तालुका मिळवेल. तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक तसेच विद्यार्थी यासाठी खूप मेहनत घेत आहेत. मागील वर्षी देखील मुलींची जनरल चॅम्पियनशिप वैभववाडी तालुक्याने मिळवली होती. ही यशस्वी घोडदौड यापुढेही सुरूच राहील असे सांगितले.

 यावेळी आमदार श्री राणे यांचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मशाल पेटवून या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री.राणे यांनी केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय पाताडे यांनी तर आभार विशाल पावसकर यांनी मानले.