
सावंतवाडी : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पुरस्कृत सह्याद्री विध्यार्थी अकादमी सिंधुदुर्ग विभाग आणि राष्ट्रवीर संघ आयोजित शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण 'सह्याद्री संस्कार शिबीर'माळगांव येथे आज पासून सुरू झाले. हे शिबिर सोमवार दि. ४ नोव्हेंबर ते रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ या ७ दिवसांच्या कालावधीचे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरात सहभागी होऊ इच्छिणार्याचे किमान वय 8 वर्षे पूर्ण व कमाल 18 वर्ष असणे आवश्यक आहे. शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या मळगाव परिसरातील (सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित) मुला व मुलींना प्राधान्याने सहभागी करून घेतले जाईल.
या शिबिरामध्ये मुलं आणि मुलींना तलवार बाजी, लाठी - काठी, भाला फेक, दांडपट्टा अशे प्रकार शिकवण्यात येतील. तसेच या शिबिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गारद द्यायला, ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र सुद्धा शिकवण्यात येतील. शिबिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी हेरगिरी साठी बहिर्जी नाईक वापरत असलेली करपल्लवी भाषा सुद्धा शिकवण्यात येणार आहे.तसेच दररोज सकाळी मुल आणि मुलीं कडून सूर्य नमस्कार तसेच इतर व्यायाम प्रकार करून घेण्यात येतील.आताची मुल छत्रपती शिवाजी महाराज समजून घेऊन शिवकार्यात सामील व्हावीत म्हणून हे शिबीर मुलं आणि मुलींना निशुल्क ठेवण्यात आलं असल्याची माहिती आयोजक सुनिल राऊळ ,प्रमोद मगर,रितेश राऊळ ,एकनाथ गुरव आदींनी दिली.