
वेंगुर्ले : वेंगुर्ला तालुका क्रीडा संकुल येथे नव्याने क्रीडा सुविधा निर्माण करण्याकरिता मल्टि प्लेफिल्ड हॉल या सुमारे ३ कोटी ६५ लाख ९९ हजाराच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे मागणी केली होती. याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून बंदर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सदर कामाला मंजुरी देण्याचे आदेश दिले आहेत.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ले तालुक्याच्या तालुका क्रीडा संकुलामध्ये नव्याने क्रीडा सुविधा निर्माण करण्याकरिता मल्टि प्लेफिल्ड हॉलच्या कामाचे सुमारे ३ कोटी ६५ लाख ९९ हजार ११६ रुपये एवढ्या रकमेचे अंदाजपत्र व आराखडा वास्तुविशारदांनी तयार करून जिल्हा प्रशासनाकडून क्रीडा व युवक सेवा आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केले आहे. तरी या कामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यास आपल्या स्तरावरून लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
दरम्यान, याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सदर प्रस्तावाला मंजुरी देण्याचे आदेश दिले आहेत. हा जिल्ह्यातील एकमेव प्ले फिल्ड हॉल वेंगुर्ला येथे होणार असून. यामुळे पुढील काळात याठिकाणी विविध इनडोअर क्रीडा प्रकारांना व विशेष म्हणजे व्हॉलीबॉल व खो-खो या खेळांना चालना मिळणार आहे. याचा फायदा वेंगुर्ला तालुक्यासहित जिल्ह्यातील खेळाडूंना होणार आहे.