लोकवर्गणीतून रुग्णवाहिका संकल्पनेला उस्फूर्त प्रतिसाद | लोकवर्गणीचा ओघ सुरूच !

बीकेसी व ईवीसन इन्फ्रास्ट्रक्चरकडून प्रत्येकी लाखाची मदत
Edited by: संदीप देसाई
Published on: February 10, 2023 19:06 PM
views 151  views

दोडामार्ग : लोकवर्गणीतून रुग्णवाहिका या संकल्पनेला दोडामार्ग तालुक्यातून सामान्य नागरिक ते उद्योजक व्यावसायिक, संघटना यांचा सर्व स्तरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन दिवसात ४ लाखाहून अधिक रक्कम दानशूर व्यक्तींकडून रुग्णवाहकेसाठी जमा झाली आहे. 


बीकेसी तथा भोसले नॉलेज सिटीचे सर्वेसर्वा अच्युत भोसले व एविसन इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी अनिल वर्मा यांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचं योगदान या रुग्णवाहिकेसाठी संयोजकांकडे जमा केल आहे.


दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर एवळे यांनी तालुक्यातील जनतेला हाक देत शासनाच्या रुग्णवाहिकांबरोबरच अन्य तालुक्यात ज्याप्रमाणे प्यारेलल खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत, तशीच एखादी रुग्णवाहिका जिच्यावर लोकांचा हक्क असेल, अशी लोकवर्गणीतून रुग्णवाहिका संकल्पना मांडली. मुळातच आरोग्य क्षेत्रात पिछाडीवर असलेला दोडामार्ग तालुका पूर्णपणे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या भरोशावर आणि रुग्णसेवेवर पूर्णपणे अवलंबून असतो. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एवळे व त्यांची संपूर्ण टीम दोडामार्ग तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र काम करत असते. त्यामुळे येथील डॉक्टरांनी दोडामार्ग मधीलच रुग्णांच्या हितासाठी मांडलेली संकल्पना तमाम दोडामार्ग वासियांनी लागलीच उचलून धरली.


दोडामार्ग तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, पत्रकार, वकील, शिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, युवाई नव्हे तर सर्व क्षेत्रातील संस्था, उद्योजक व्यावसायिक या साऱ्यांनीच मनापासून या संकलपनेला प्रत्यक्ष हातभार लावत पाठबळ दिलं. अगदी कोकण ते मुंबईपर्यंत आणि गोवा ते कर्नाटक पर्यंत ज्यांचा ज्यांचा दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाशी आणि येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या कर्तव्यदक्ष कामाशी संबंध आला त्यांनी भरभरून या संकल्पनेला सहकार्य केलं. जमेल तशी लोकवर्गणी जमा करून लोकवर्गणीतून हक्काची रुग्णवाहिका या संकल्पनेला ताकद दिली आहे.


सुरुवातीला जाहीर झालेल्या ७ लाख रकमेनंतर गेल्या चार दिवसात अजून ३ लाखाहून अधिक रक्कम संयोजकांकडे विविध सामाजिक संघटना उद्योजक व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांनी रोख स्वरूपात, गुगल पे च्या माध्यमातून जमा केली आहे. यात भोसले नॉलेज सिटीचे चेअरमन अच्युत भोसले यांनी १ लाख रुपये, तर दोडामार्ग तालुक्यात उद्योजक म्हणून कार्यरत असलेले गीरोडे येथील एविसन इन्फ्रास्ट्रक्चर चे एमडी अनिल वर्मा यांनी १,०१,१२५/- रुपये मधील हळबे कॉलेज २१,२००/-  रुपये तर दोडामार्ग शहर सोसायटीकडून ५ हजार रुपये प्रत्यक्ष भेटून डॉक्टर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे. समाजातून मिळणारा हा प्रतिसाद पाहता डॉक्टरांनी दिलेली हाक आणि जनतेकडून मिळणारा प्रतिसाद यामुळे दोडामार्गात दोडामार्ग वासियांची हक्काची रुग्णवाहिका ही संकल्पना लवकरच सत्यात उतरेल यात शंका नाही. अजूनही आरोग्य क्षेत्रातील या पवित्र कार्यासाठी ज्यांना लोकवर्गणी द्यायची असेल त्यांनी डॉ.ज्ञानेश्वर एवळे, पत्रकार संदीप देसाई व तेजस देसाई यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.