प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद, विजय निश्चित !

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारास येणार : दीपक केसरकर
Edited by:
Published on: November 10, 2024 14:40 PM
views 273  views

सावंतवाडी : माझ्या प्रचाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते गावागावात प्रचार करत आहेत. खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत आहोत. हे दोन नेते सोबत असल्याने व माझे व्यक्तिगत संबंध लोकांसोबत असल्याने विजय निश्चित आहे. प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मतदारसंघात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या तारखा निश्चित झाल्यानंतर कळविल्या जातील अशी माहिती महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी दिली. तसेच राज ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध असल्याने मनसेची महायुतीला साथ मिळेल असेही सांगितले.

ते म्हणाले, महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने मतदारसंघात यायची इच्छा असताना तेवढा वेळ देण शक्य होत नाही. राज्यात आमचं सरकार पुन्हा येणार असून यामध्ये मला कोकणची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. तसेच सावंतवाडी शहरात लोकसभेत काही गैरसमज पसरवले गेले. विशिष्ट समाजाकडे फेक नरेटीव्ह पसरवले गेले. मात्र, यावेळी त्याचा परिणाम होणार नाही. माझा घरोघरी संपर्क आहे. लोकसभेला पसरवलेले गैरसमज आम्ही दूर करू व शहरात देखील मोठं मताधिक्य मिळवू असा विश्वास व्यक्त केला. 

दरम्यान, शिरोडा गावच्या सरपंच सौ. रेडकर यांनी पक्षात प्रवेश केला आहे. येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तिलारीचा प्रकल्प पूर्ण झाल्याने वेंगुर्ला तालुक्यातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे. तसेच येथील शेतकऱ्यांना ६० कोटींचा मोबदला मंजूर झाला असून तिनं टप्प्यात तो दिला जाणार आहे. पंचतारांकित हॉटेलच भुमिपूजन झालं असून आचारसंहितेनंतर हा मोबदला शेतकऱ्यांना मिळेल. समृद्ध अशी किनारपट्टी या भागाला लाभली आहे. रेडी, शिरोडा भागात पर्यटनदृष्ट्या प्रकल्प प्रस्तावित आहेत. काही कार्यान्वित करण्यात आले आहेत. यासाठी शिरोडा सरपंच यांची साथ लाभणार आहे. शंकर कांबळे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची आम्हाला साथ लाभली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिरोडा, रेडी आदी भागात सरकारच्या माध्यमातून विकासकांवर भर दिला जाईल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.‌यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, तालुकाप्रमुख नारायण राणे, सुरज परब, सुनील डुबळे आदी उपस्थित होते.