
सावंतवाडी : सावंतवाडी माठेवाडा इथं 20 मार्च ते 25 मार्च या सहा दिवसांच्या कालावधीत विद्यार्थांसाठी हस्ताक्षर सुधार व व्यक्तिमत्व विकास शिबिर विकास गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. सावंतवाडीच्या विविध शाळांतील विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
शिबिरात विद्यार्थांच्या अक्षराला वळण लावताना त्यांच्यातील कलागुण विकसित करण्यावर भर देण्यात आला. स्वप्ना गोवेकर यांनीही आपल्या कथा वाचन करून मुलांमध्ये लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न केले. जीवनात कोणता तरी छंद जोपासणे किती महत्वाचे आहे ते सांगून सुट्टीच्या दिवसांचा देखील सदुपयोग करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी आवश्यक तो योगाभ्यास शिकविण्यात आला.
सहा दिवस चाललेल्या या व्यक्तिमत्व विकास शिबिरात विद्यार्थ्यांनी पुरेपूर आनंद लुटला. आज या शिबिराच्या सांगता प्रसंगी मधुरा कविटकर, कृष्णा पास्ते व वासुदेव कामत या विद्यार्थ्यांनी शिबिराविषयी बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सहभागी मुलांचा विविध गुण दर्शन कार्यक्रम देखील पार पडला. तसेच निवडक विद्यार्थ्यांचा प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला.