'घे भरारी फाऊंडेशन'ची महिला दशावतार नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भरगच्च कार्यक्रमांनी आणली रंगत
Edited by: विनायक गांवस
Published on: March 12, 2026 17:37 PM
views 23  views

सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'घे भरारी फाऊंडेशन' सावंतवाडीच्यावतीने जगन्नाथराव भोसले उद्यानात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला व दिव्यांग मुलांचा गौरव, मजेशीर खेळ आणि महिलांनीच सादर केलेल्या दशावतारी नाट्यप्रयोगाने या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

साहस प्रतिष्ठान संचलित दिव्यांग विकास केंद्रातील मुलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, दीपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, नीलम नाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्या संजना संजू परब, मंगल नाईक-जोशी, पोलीस अधिकारी ज्योती दुधवडकर व प्राजक्ता सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उद्योजक महेश कुमठेकर व दशावतारी कलाकार गौरव शिर्के यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मनीषा नावांगुळ, मनीषा मिशाळ, अनिता म्हापसेकर, साची दळवी, प्रीती काजारे, दीपा नेवगी व आर्या सुभेदार यांनी फाऊंडेशनचे सदस्यत्व स्वीकारले. मेघना राऊळ, संध्या पवार व साची दळवी यांच्या कराओके गायनाने उपस्थितांची मने जिंकली.    

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 'कृष्णभोजन' या दशावतारी नाटकात मोहिनी मडगावकर, मेघा भोगटे, वैष्णवी बांदेकर, वंदना मडगावकर, रेखा कुमठेकर, समीक्षा मडगावकर, अरुणा नाईक, सलोनी वंजारी, सुस्मिता नाईक, वैभवी घाटगे व स्वप्नाली कारेकर यांनी भूमिका साकारल्या. या नाटकाला वैभव पाटकर, निलेश मांजरेकर व समीर मांजरेकर यांनी संगीतसाथ दिली.

याप्रसंगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेखा कुमठेकर, कार्याध्यक्षा मेघना राऊळ, उपाध्यक्षा संध्या पवार, सचिव सलोनी वंजारी, खजिनदार स्वप्नाली कारेकर यांच्यासह इतर सदस्या व मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले.